अकोला: ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर अकोला जिल्ह्यात पहिली आत्महत्या (Akola News) झाल्याची माहितीसमोर आली आहे. ओबीसी नेते विजय बोचरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पातुर तालुक्यातील आलेगाव या आपल्या गावातील बसस्थानकाच्या शेडमध्ये गळफास घेत पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी मुख्यमंत्र्यांचे नावे लिहिलेलं पत्र व्हाट्सअप स्टेटसला ठेवलं होतं. (OBC Reservation) 

Continues below advertisement

OBC Reservation: पत्रातील आरोप 

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैद्राबाद गॅझेटियरनुसार काढलेला अध्यादेश मूळ ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.‌ त्यामुळे मूळ ओबीसींचे आरक्षण संपल्यात जमा असल्याची खंत देखील व्यक्त केली आहे. सरकारने ओबीसींना वाऱ्यावर सोडलं असून त्यांना मूळ प्रवाहात न येऊ द्यायचं‌ सरकारी धोरण असल्याचा आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात ओबीसी नेते विजय बोचरे यांनी आरोप केला आहे. ओबीसींच्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित नसल्याने आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचं पत्रात नमूद केलं आहे. सरकारकडे जातीय जनगणना करण्याची मागणी देखील या पत्रातून केली आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये', 'जातीय जनगणना झाली पाहिजे' आणि 'आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही' असे म्हणत अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील विजय बोचरे (वय 59) यांनी आज (9 ऑक्टोबरच्या) पहाटे आलेगाव बस स्थानकावरील प्रवासी निवाऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादी नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते, त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Continues below advertisement

OBC Reservation: आत्महत्येपूर्वी व्हाट्सअपवर ठेवले भावनिक स्टेटस

आत्महत्येपूर्वी विजय बोचरे यांनी आपल्या व्हाट्सअपवर सलग तीन भावनिक स्टेटस शेअर केले होते. पहाटे अडीचच्या सुमारास त्यांनी हे स्टेटस ठेवून त्यानंतर काही वेळातच गळफास घेतला. त्यांनी मुख्यमंत्री आणि ओबीसी नेत्यांना उद्देशून लिहिले होते की, राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आमच्या मुला-बाळांचं भविष्य धोक्यात आलं आहे. शिक्षणात, नोकरीत आणि राजकारणात आमचं स्थान हरवत चाललं आहे. आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही. जय ओबीसी, जय संविधान. त्यांनी पुढे स्पष्ट आवाहन केलं होतं की, "जातीय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये.

OBC Reservation: पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी चान्नी पोलिस अधिक तपास करीत आहेत.