अकोला : पोलिस म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती खाकी वर्दी… त्यातील कणखरपणा आणि कर्तव्यनिष्ठा. पण या खाकी वर्दीत लपलेल्या संवेदनशीलतेचं, मायेचं आणि माणुसकीचं जे दर्शन अकोला पोलिसांनी (Police) घडवलं, त्याने संपूर्ण जिल्ह्याला अक्षरशः भावूक करून टाकलं. 21 दिवसांपासून हरवलेला 15 वर्षीय ऋषिकेश कनोजिया अखेर अकोला पोलिसांनी सुखरुप त्याच्या आईच्या मिठीत परत आणला. आईच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू, आणि पोलिसांच्या चेहऱ्यावर उमटलेला समाधानाचा भावनिक क्षण म्हणजे काळजाला भिडणारी अकोल्यातील (Akola) माय-लेकाच्या भेटीची संपूर्ण कथा होय. घरगुती वादात छोट्या रागातून सुरू झालेली मोठी शोकांतिका, दु:खा लांबलचक प्रवास करुन अखेर मोठ्या आनंदात परिवर्तीत झाली.
खदान क्षेत्रात राहणारा संतोष आणि उषा कनोजिया यांचा मुलगा ऋषिकेश नववीत शिकतो, 11 सप्टेंबरला किरकोळ कारणावरून वडिलांनी त्याला झापलं. वडिलांवरचा राग मनात ठेऊन ऋषिकेश घरातून निघून गेला आणि थेट रेल्वे स्टेशन गाठलं. तिथून त्याने नागपूर–कोल्हापूर रेल्वे पकडली आणि अनोळखी जगात पाऊल टाकलं. पुढील 21 दिवसांत त्याने तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये मुक्काम केला. शेवटी तो पंढरपुरातील एका हॉटेलमध्ये कामाला लागला. तो कुठे असेल, कसा असेल, खाईल की नाही? याच्या काळजीने आई-वडिलांना अन्नाचा घास जात नव्हता. या काळात आई-वडिलांसाठी प्रत्येक क्षण एखाद्या युगासारखा होता.
अकोला पोलिसांनी शोधासाठी केले आकाश–पाताळ एक
कनोजिया कुटुंबाने तक्रार दाखल करताच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः या प्रकरणाची सुत्रं हाती घेतली. ऋषिकेशच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली. या तपासात पोलीस अधीक्षकांसह (एसपी) 4 वरिष्ठ अधिकारी, 20 अंमलदार आणि 10 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी सहभागी होते. या तुकड्यांनी ऋषिकेशच्या शोधासाठी अक्षरशः 8 जिल्हे पालथे घातले. अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, परळी वैजनाथ, लातूर, धाराशिव आणि सोलापूर अशा 1500 किमीच्या अंतरावर त्यांनी ऋषिकेशचे ठसे शोधले.
400 सीसीटीव्ही, 300 लोकांची चौकशी आणि एकच ध्यास
तपास पथकांनी रेल्वे स्टेशन, हॉटेल्स, धर्मस्थळे आणि बाजारपेठांमधील 400 सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्याचबरोबर मित्र, नातेवाईक, शाळकरी मुलं, शिक्षक, नागरिक असे जवळपास 300 लोकांचे बयान नोंदवले. प्रत्येक छोटासा क्लू तपासला गेला… प्रत्येक धागा पकडला गेला…अखेर पंढरपुरातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका मुलाची माहिती मिळाली आणि त्यावरून अकोला पोलिसांनी तात्काळ धाव घेत ऋषिकेशला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं.
आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू आणि पोलिसांच्या संवेदनशीलतेचा नमुना
21 दिवसांनी घराचा उंबरठा ओलांडत मुलगा परत दिसताच आई उषा कनोजियांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू, आनंद, वेदना, सुटका आणि कृतज्ञता याचा एकत्रित उद्रेक होते. तिच्या अश्रूंनी उपस्थित प्रत्येकाचं मन पिळवटून टाकलं. अकोला पोलिसांच्या चेहऱ्यावर त्या क्षणी उमटलं ते समाधान शब्दांच्या पलीकडचं होतं.
एसपी अर्चित चांडक यांची माणुसकी
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक म्हणाले, "प्रत्येक मूल हे आपल्या समाजाचं आहे. फक्त शोध नाही, तर त्या कुटुंबाच्या काळजावरचा दगड हलवणं ही आमची जबाबदारी आहे. हा तपास संवेदनशीलता आणि पोलिसिंगच्या समन्वयाने झाला." त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या तपासाचं संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
मोबाईलमुळे हरवलेला संवाद, मोठं सामाजिक आव्हान
या प्रकरणामुळे एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे. उमलत्या वयातील मुलांमध्ये वाढती चिडचिड, ताणतणाव, आणि पालक–मुलांतील तुटलेला संवाद.मोबाईल, सोशल मीडिया आणि बदलती जीवनशैली यामुळे कुटुंबातल्या संवादाची जागा कमी होत चालली आहे. वेळेत संवाद झाला, तर अशा घटना टाळता येऊ शकतात, हे नक्की. अकोला पोलिसांच्या संवेदनशीलतेला सलाम. ऋषिकेश कनोजिया याचा शोध हा फक्त तपास नव्हता… तो होता माणुसकी जपणाऱ्या पोलिसिंगचा जिवंत नमुना. अकोला पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता, चिकाटी आणि माणुसकी जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि समाजाच्या मनात कायमस्वरूपी उमटणार आहे. 'एबीपी माझा' अकोला पोलिसांच्या या विलक्षण कार्याला सलाम करतो!
हेही वाचा