Akola Latest Crime News Update : अकोल्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांच्यावर अज्ञात गुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात विशाल कपले यांचा मृत्यू झाला आहे. अकेल्यातील जठारपेठ चौकातील गणेश स्वीट मार्टसमोर कपले यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये कपले गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान विशाल कपले यांचा मृत्यू झाला. कपले यांच्यावर हल्ला झाल्याचं समजताच शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. दवाखान्यात शिवसैनिकांची गर्दी झाली आहे.
अकोल्यातील जठारपेठ चौकातील गणेश स्वीट मार्टसमोर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडलीय. हे ठिकाण शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असताना याचवेळी हा खून झाला आहे. दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या भ्याड हल्ल्यात गंभीर जखमी विशालचा खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
विशाल यांनी काही दिवसांपूर्वी ते रहात असलेल्या उमरी परिसरातील अवैध धंद्यांसंदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली होतीय. त्याची काही किनार त्यांच्या खुनाशी आहे का?, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला असून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दोन महिन्यांपूर्वी अकोल्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपशहरप्रमुख भागवत देशमुखांचीही वैयक्तिक वैमनस्यातून हत्या झाला होता. पोलीसांनी आजच्या घटनेवर सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
अशी घडली घटना :
अकोला शहरातील जठारपेठ भागात असलेल्या गणेश स्वीट मार्ट परिसरात आज सायंकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले यांच्यावर दोन अज्ञात लोकांनी चाकू हल्ला केला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ विशालला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. चाकू हल्ल्यामध्ये विशाल गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दरम्यान हल्ला करणाऱ्यांमध्ये दोन जणांचा समावेश असून हे दोघेही मोठी उमरी परिसरातील रहिवासी असल्याचं बोललं जात आहे. तरीही पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
रूग्णालयात शिवसैनिकांची गर्दी :
या घटनेनंतर खाजगी रुग्णालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. दरम्यान विशालच्या हत्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही. जठारपेठ ते मोठी उमरी परिसर हा गर्दीचा रस्ता आहे. या रस्त्यावरील जठारपेठ चौकात ही घटना घडली. या गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस अधीक्षक सुभाष दुधगावकर यांच्यासह अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या विशालचे मारेकरी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
विशालने उठवला होता उमरी परिसरातील अवैध धंद्यांविरोधात आवाज.
विशाल उमरी परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवत होता. अनेक सामाजिक उपक्रमांबरोबरच रक्तदानासारख्या उपक्रमात ते सदैव अग्रेसर असायचे. अलिकडेच मोठी उमरी, गुडधी परिसरात अनेक हॉटेलवर सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबतही त्यांनी आवाज उचलला होता. यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदनंही त्यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.