Pune : राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज पुण्याच्या (Pune) दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून आपल्या या नियोजित दौऱ्याला सुरुवात केलीय. यावेळी त्यांनी मुंढवा केशवनगर या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यासोबतच मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळची देखील पाहणी केलीय. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी अजित दादांपुढे मांडत गाऱ्हाणे सांगितले. यावेळी मुंढवा, केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली असता, अजित दादांनी थेट पुण्यातील बिल्डरांना इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा. नागरिकांनी फ्लॅट घेऊन जर बिल्डरलोकांना मस्ती आली असेल तर जे आपल्या हातात आहे ती ॲक्शन घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्याय.
पाणी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्याला फोन, तात्काळ हजर राहण्याच्या सूचना
दरम्यान, या दौऱ्यात केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, ही तक्रार नागरिकांनी अजित पवार यांच्याकडे केली. यानंतर अजित दादांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावत चौकशी केली . त्यानंतर अजित पवारांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन करत हडपसर गाडीतळाला यायला सांगितलंय. मागील काही महिन्यांपासून मुंढवा भागात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पहाटेच या भागातले काही नागरिक अजित पवारांना भेटायला आले आणि त्यांनी पाण्याच्या प्रश्नाची समस्या बोलून दाखवली.
तुम्ही शहाणे बना अन् अवैध दारू विक्रीचे धंदे बंद करा- अजित पवार
दुसरीकडे, केशवनगर, मुंढवा परिसरात बेकायदेशीर रित्या मद्यविक्री होत असल्याची अनेक नागरिकांनी अजित पवारांकडे तक्रार केली. यावर बोलताना दारू विक्रेत्यांना देखील अजित पवारांनी गंभीर इशारा दिलाय. तुम्ही शहाणे बना आणि अवैध दारू विक्री करण्याचे धंदे बंद करा, असे म्हणत अजित दादांनी तंबी दिली आहे.
मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा
मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा, असे म्हणत पुण्यातल्या एका महिलेने थेट अजित पवारांनाच सल्ला दिला आहे. वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे कळेल असेही या तक्रारदार महिला यावेळी म्हणाल्या आहेत. मात्र यावेळी पर्रिकरांच नाव घेतल्यावर अजित पवार यांनी उलट प्रश्न विचारात पर्रिकर कोण? असा प्रतिसवाल केला असता महिलेने हि गोव्याचे मिनिस्टर असं उत्तर दिलं. ट्रॅफिक संदर्भात माहिती नाही अस होऊ शकत नाही. तुम्ही पण कधीतरी माहिती न देता फिरा. तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही सांगणर हा यावरचा उपाय नाही. असेही या महिला तक्रारदाराने अजित दादांना सांगत आपलं गाऱ्हाणं मांडलंय.
हेही वाचा
- काय वाट्टेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करू; नाशिकमधून शरद पवारांचे वक्तव्य
- Mumbai Rains: मुंबईत काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, ठाण्यासह नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, पुढील 3 तासांसाठी हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट