कल्याण, ठाणे :  "जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताला प्रतिष्ठा मिळाली आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) 18-18 तास काम करतात. दिवाळीला सुद्धा ते घरी जात नाहीत. भारत (Bharat) सर्व क्षेत्रात सध्या आगेकुच करत आहेत. चंद्रयान देखील यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचले आहे." असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. कल्याण येथे अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या वेळी अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचा पाढाच वाचला आहे. 


भारताची अर्थव्यवस्था टॉप 5 वर; अजित पवार 


अजित पवार म्हणाले,  जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था टॉप 5 वर पोहोचली आहे. 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.  देशातील एकही व्यक्ती उपाशी पोटी झोपणार नाही, याची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. शेतकऱ्याला वर्षाला 6 केंद्र सरकारकडून मिळतात. राज्य सरकारकडूनही 6 हजाराची भर टाकली. आता शेतकऱ्याला वर्षाला 12 हजार रुपये मिळतात, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. 


महापुरुषांच्या विचारावर राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरु


शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मिायांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्याच मार्गावर आपल्याला पुढे जायचे आहे. सर्व धर्मियांच्या सणांचा आपण आदर केला पाहिजे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे. कधीही कोणाला वाऱ्यावर सोडायचे नाही. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायचे आहे. राज्यातील जनता आपल्या पाठीशी उभी राहणार आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला. 


महिला धोरणावर काम सुरु; अजित पवारांकडून आदिती तटकरेंचे कौतुक


सत्तेत राहिलो तरच जनतेची कामे होतात. सध्या मंत्री आदिती तटकरे महिला धोरणावर चांगले काम करत आहेत. मेलो तरी चालेल पण सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत. तरुण-तरुणींचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. सर्वसामन्यांचे कल्याण हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्यासाठी नवे धरणे बांधण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची साथ असली पाहिजे, असे मत अजित पवार यांनी नोंदवले.  


ग्रामीण भागावर अन्याय होणार नाही : अजित पवार 


ग्रामीण भागावर होणाऱ्या अन्यायावर अजित पवारांनी भाष्य केले.  शहरी भागाला पाणीपुरवठा करताना ग्रामीण भागावर अन्याय होणार नाही. याची आम्ही काळजी घेत आहोत. वंदे भारत ट्रेन मुंबई ते नाशिक सुरु केली. समृद्धी महामार्ग देखील सुरु केलेला आहे. तरुण -तरुणींच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आम्ही काम करतोय, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar : 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही, हट्टीपणा सुरुच आहे; अजितदादांचा शरद पवारांना टोला