अहमदनगर : झिका (Zika Virus) या नव्या आजाराचे रुग्ण पुण्यापाठोपाठ (Pune) आता सर्वत्र सापडू लागलेत. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) येथे झिकाचे दोन रुग्ण नव्याने सापडले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून वेळीच उपचार करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 


या अगोदर नगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीला झिकाची लागण झाली होती. तो व्यक्ती आता आजारातून बरा झालेला आहे. आता संगमनेर तालुक्यात दोन गरोदर महिलांना या आजाराची लागण झाली आहे. 


झिका रुग्णांची प्रकृती स्थिर


तपासामध्ये दोन गरोदर महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नगरच्या जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच नाशिकच्या पथकाने संगमनेर या ठिकाणी धाव घेत या ठिकाणी सर्व गरोदर महिलांची तपासणी करून घ्यावी, अशा प्रकारचे निर्देश दिलेले होते. ज्या दोन महिलांना झिकाची लागण झाली होती. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. तसेच पोटामध्ये असलेले गर्भाशय सुद्धा चांगल्या प्रकारचे असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.  


झिकापासून बचाव कसा कराल ?


झिकापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने नियमावली जाहीर केली आहे. घरामध्ये डास होणार नाही, याची काळजी घ्या. घरात स्वच्छता ठेवा. मच्छरदाणीचा जास्तीत जास्त वापर करा. घरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नका. घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. आपल्या परिसरातदेखील स्वच्छता बाळगण्याचं आवाहन झिका आणि डेंग्युच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. झिकाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती मातांचे आहे. झिका विषाणूपासून बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका. पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. घरामध्ये डास शिरणार नाही याची काळजी घ्या. डास चावणार नाही याची काळजी घ्या. घरात डास आले तर त्यासाठी कडुलिंबाचा पाला जाळा. संध्याकाळी दारे खिडक्या उघड्या ठेऊ नका. कापूराचा वापर करून तुम्ही 15 ते 20 मिनिटात डासांना दूर पळवू शकता. कडुलिंब आणि नारळाचं तेल एकत्र करून आपल्या शरीरावर चोळा. दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असा आवाहन करण्यात आले आहे. 


आणखी वाचा 


Pune News: पुणेकरांसाठी धोक्याची घंटा! झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला, डेंग्यू रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ