Sunil Tatkar : 2014 सालापासून भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचा विषय आमच्या सुरु होता. मात्र, त्याला मुहूर्त लागत नव्हता, यंदा मात्र आम्ही अजित दादांच्या उपस्थितीमध्ये भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी केलं. आम्ही आज अजितदादांसोबत आहोत, राजकारणात भावनेपेक्षा कृतीला महत्त्व द्यावे लागते असेही तटकरे म्हणाले. आता पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं आहे.
बीडमध्ये घडलेली घटना ही अतिशय गंभीर
आगामी काळामध्ये पक्ष बांधणी कशा पद्धतीने करायची आणि जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कशा पद्धतीने करायची यासह आगामी पक्षाची दिशा कशी असावी यासाठी हे अधिवेशन असल्याचे तटकरे म्हणाले. बीडमध्ये घडलेली घटना ही अतिशय गंभीर आहे. परभणी असेल अथवा सैफ अली खानचा विषय असेल या घटना अतिशय गंभीर असल्याचे तटकरे म्हणाले.
बीडची घटना घडल्यानंतर आम्ही या प्रकरणांमध्ये चौकशी करुन जे मास्टरमाइंड आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका व्यक्त केलेली असल्याचे तटकरे म्हणाले. राज्य सरकारनं या घटनेच्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या कमिट्या चौकशीच्या नेमल्या आहेत. त्याची चौकशी सध्या सुरु आहे गुन्ह्याची उकल झाली पाहिजे असे ते म्हणाले.
अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहणार का?
शिर्डीच उद्या होणाऱ्या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहणार का? या विषयावर विचारले असता तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होण्यापासून छगन भुजबळ हे पक्षासमवेत आहेत. त्यामुळं आम्ही त्यांना या ठिकाणी निमंत्रण दिलेले आहे. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील अशी खात्री असल्याचे तटकरे म्हणाले.
शेतकरी कर्जमाफी -
वीज माफीचा 45 लाख शेतकऱ्यांना लाभ
आम्ही जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लढलो त्यावेळेला आम्ही जे जे काही वचने दिलेली होती यामध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफी असेल किंवा 2100 रुपये लाडक्या बहिणीला देणार असेल त्याची सर्वांची पूर्तता आम्ही करणार आहोत. विशेष म्हणजे 14000 कोटीची वीज बिलाची थकबाकी जी होत तिचा प्रश्न आम्ही सोडवला असल्याचेही तटकरे यांनी सांगितले. 45 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. मात्र कर्जमाफीबाबत ठोस बोलण्याच तटकरे यांनी नकार दिला.
अधिवेशनात कोणत्या विषयांवर चर्चा होणार?
शिर्डी येथे होणाऱ्या शिबिरामध्ये राज्यभरातून पदाधिकारी येणार आहेत. या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसह नागरिकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न ,अवकाळी पाऊस, कृषी क्षेत्र ,यासह राजकीय विषयांवर सुद्धा चर्चा होणार असल्याचे तटकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला