Chhatrapati Sambhajinagar : मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारे अशी म्हण आपण सतत ऐकतो. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्यक्षात असा प्रकार समोर आला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये समोर आली आहे. चक्क शासकीय रुग्णालयात आणलेल्या मृत महिलांच्या अंगावरील सोनं आणि पैसे चोरीला गेल्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, हैदराबाद येथील भाविक शिर्डीला दर्शनासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा गंगापूरजवळ अपघात झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं त्यांना रुग्णवाहिकेतून गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं होतं. ज्यावेळी मृतदेह रुग्णवाहिकेत टाकण्यात आला त्यावेळी त्या रुग्णांच्या अंगावर सोनं होते. मात्र जेव्हा नातेवाईक रुग्णालयात पोहोचले त्यावेळी त्यांच्या अंगावरील सोन चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारे कोण ?असा प्रश्न उपस्थित होत आहे? दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
भाविकांची जीप उसाच्या ट्रॉलीवर धडकून भीषण अपघात
घृष्णेश्वराचं दर्शन करुन शिर्डीला परतणाऱ्या हैदराबादच्या भाविकांवर काळानं घाला घातला. या भाविकांची जीप उसाच्या ट्रॉलीवर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 4 भाविकांचा मृत्यू झाला असून 11 भाविक जखमी झाले आहेत. ही घटना गंगापूर वैजापूर महामार्गावरील तांबोळगोटा फाटा इथं बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. प्रेमलता श्यामशेट्टी (56), प्रसन्न लक्ष्मी ( 48), वैद्विक श्यामशेट्टी (6 महिने), अक्षिता श्यामशेट्टी (20) अशी अपघातात ठार झालेल्या भाविकांची नावं आहेत.
गंगापूर मार्गे शिर्डीला जाताना घडला अपघात
हैदराबाद इथले 14 भाविक शिर्डी इथं दर्शनासाठी आले होते. यावेळी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेऊन ते बुधवारी सकाळी जीप क्रमांक एसएच 17, बीडी 1897 नं वेरुळ लेणी पाहून घृष्णेश्वराचं दर्शनाला गेले. घृष्णेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गंगापूर मार्गे शिर्डीला परतीचा रस्ता धरला. मात्र बुधारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास महालगावकडं उस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला या भाविकांच्या कारनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला, तर 11 भाविक जखमी झाले.
महत्वाच्या बातम्या: