Ahmadnagar News: अहमदनगर शहरात भटकी कुत्री आणि त्यांचे निर्बीजीकरण हा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनीच महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत... भटकी कुत्री पकडण्याचा आणि निर्बिजीकरण करण्याचा ठेका दिलेल्या संस्थेवरही पदाधिकाऱ्यांनी आरोप केले आहेत.
अहमदनगर शहरातील भटकी कुत्री पकडण्याचा आणि त्यांचं निर्बीजीकरण करण्याचा ठेका पुणे येथील पीपल्स फॉर ॲनिमल या खासगी संस्थेला दिला होता. मात्र आता या संस्थेबाबत अहमदनगर महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनीच गंभीर आरोप केले आहेत. ज्या संस्थेला महानगरपालिकेनं हा ठेका दिला आहे, ती संस्थाच बोगस असून या संस्थेनं ज्या-ज्या ठिकाणी काम केलं आहे, त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला. फक्त एका सर्टिफिकेटच्या आधारावर ही संस्था ठेका घेऊन भ्रष्टाचार करत असून ही संस्था बाहेरगावच्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणाचे फोटो जोडून महानगरपालिकेकडून पैसे उकळत असल्याचं राठोड यांनी म्हंटलं आहे.
भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर 2021-22 मध्ये जवळपास 67 लाख रुपये खर्च
भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर 2021-22 मध्ये जवळपास 67 लाख रुपये खर्च करून 5336 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. तर एप्रिल 2022 ते मार्च 2023 वर्षात जवळपास सात हजार कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यात आलं आहे. त्यासाठी 79 लाख रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती अहमदनगर महानगरपालिकेचे उपयुक्त अजित निकत यांनी दिली आहे.
एकीकडे मोकाट कुत्र्यांच्याबाबत मनपाकडून काम केलं जात असल्याचा दावा जरी केला जात असला तरी दुसरीकडे शहरात कुत्र्यांनी चावा घेतलेल्या व्यक्तींची संख्या वाढतच आहे. कुत्र्यानं चावा घेतला म्हणून जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांची संख्या फार मोठी आहे. ऑगस्ट 2023 मध्ये 426 लोकांना कुत्र्यानं चावा घेतलेला, तर सप्टेंबर 2023 मध्ये 365 लोकांना कुत्र्यानं चावा घेतला, तर ऑक्टोबरमध्ये 496 जणांना कुत्रा चावला.
कुत्र्याने चावा घेतलेल्या व्यक्तींची संख्या
ऑगस्ट 2023 मध्ये : 426
सप्टेंबर 2023 मध्ये : 365
ऑक्टोबर 2023 मध्ये : 496
एकूणच काय तर कोट्यवधी रुपये खर्च करून देखील अहमदनगर शहरात कुत्र्यांची समस्या काही थांबायचं नाव घेत नाही. अहमदनगर शहरातील नागरिकांना चोरापासून नव्हे तर कुत्र्यांपासून संरक्षण द्या, अशी म्हणायची वेळ आली असल्याचं शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी म्हंटलं आहे. नागरिक महानगरपालिकेला कररूपी पैसा भरून हा पैसा भ्रष्टाचारानं ठेकेदार संस्थेच्या घशात घालण्याचा डाव महानगरपालिकेच्या प्रशासनानं केला असल्याचा गंभीर आरोप बोराटे यांनी केला आहे. कुत्र्यांचं निर्बिजीकरण न करता हा पैसा ठेकेदार संस्थेला दिला जातोय, असं सांगत शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या लवकरात लवकर दूर झाली नाही तर आयुक्तांच्या दालनात कुत्र्यांची पिल्लं सोडण्याचा इशाराही नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दिला आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून देखील कुत्र्यांची संख्या वाढत असल्यानं नागरिकांना रस्त्यानं फिरणं अवघड झालं आहे. लहान मुलांवर कुत्र्यांकडून हल्ला होईल, या भितीपोटी पालक मुलांना घरातच ठेवत असल्यानं त्यांचं बालपण कोंडवाड्याप्रमाणे झालं आहे. एकीकडे महानगरपालिका विकासासाठी पैसे नाही म्हणून ओरडत असताना कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून याबाबत चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.