अहिल्यानगर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मातीपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले (Shivaji Kardile) यांनी याबाबत वक्तव्य केलंय.
अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. दक्षिण अहिल्यानगर जिल्हा आणि उत्तर अहिल्यानगर जिल्हा. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या तुलनेत दक्षिण अहिल्यानगर जिल्हा तसा अवर्षणप्रवण क्षेत्र असलेला जिल्हा. सर्वच धरणं ही उत्तरेकडे आहेत. तसेच शिर्डी, शनिशिंगणापूरसारखी दोन मोठी देवस्थानं असल्याने उत्तर नगर जिल्ह्याचा विकास अधिक झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विमानतळ तेही शिर्डी म्हणजेच अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात आहे. त्यातच राजकीयदृष्टया देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तरेला नेहमीच झुकतं माप मिळतं. मंत्री पदाचे वाटप असो की पक्षातील मोठ्या जबाबदाऱ्या या उत्तरेकडे जास्त मिळतात. त्यात राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, दिवंगत मधुकर पिचड, बाळासाहेब विखे यांच्यासारख्या उत्तरेतील अनेकांनी मंत्रिपदं उपभोगली. मात्र दक्षिणेकडे राम शिंदे, बबनराव पाचपुते, अनिल राठोड, शिवाजी कर्डीले यांच्या वाट्याला कमी काळासाठी मंत्रिपदं आली. त्यातच शिर्डी देवस्थान उत्तरेकडे असल्याने राज्यातीलच नाही तर देशातील अनेक मोठ्या नेत्यांचा राबता हा उत्तर नगर जिल्ह्यातच असतो. नुकतेच शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन झाले, त्यामुळे देशभरातील अनेक नेत्यांनी उत्तर नगर जिल्ह्याचा दौरा केला.
अहिल्यानगर जिल्हा विभाजनाच्या मागणीला पुन्हा जोर
हाच धागा पकडत भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांनी शिर्डीप्रमाणे दक्षिण नगर जिल्ह्यातही एखादं मोठं देवस्थान उभारावं लागेल म्हणजे आमच्याकडेही मोठं मोठे नेते येतील, असं म्हटलं आहे. तर आमदार शिवाजी कर्डीले यांचे जावई आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील जिल्हा विभाजनाची मागणी पुन्हा एकदा केली आहे. जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी जिल्हा विभाजन झालंच पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
दक्षिण नगर जिल्ह्यातील नेत्यांवर अन्याय?
अहिल्यानगर जिल्ह्यात समतोल विकास व्हावा आणि प्रशासकीय कामकाजाला अडथळा येऊ नये, यासाठी अतिरिक्त पद निर्मिती करून उत्तरेकडे अनेक शासकीय कार्यालये निर्माण करण्यात आली. पण राजकीय समतोल काही होताना दिसत नाही. त्यामुळे दक्षिणकडील नेते नेहमीच जिल्हा विभाजनाची मागणी करत असतात. राधाकृष्ण विखे , बाळासाहेब थोरात यांच्या सारख्या नेत्यांना मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती मिळतात. मात्र, दक्षिण नगर जिल्ह्यातील नेत्यांवर नेहमीच अन्याय होत असल्याची चर्चा खासगीत सुरू असते. यंदा देखील तीन टर्म आमदार राहिलेल्या मोनिका राजळे यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती, संग्राम जगताप यांच्या देखील नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळेच की काय नेते मंडळी जिल्हा विभाजनाची मागणी करत असतात. दुसरीकडे नागरिकांनाही जिल्हा विभाजन व्हावं, असंच वाटतं. मात्र ते प्रशासकीय कामे सुरळीत व्हावे यासाठी वाटतं. केवळ राजकारण म्हणून जिल्हा विभाजनाचा मुद्दा राजकीय नेत्यांनी लावून न धरता सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न देखील सोडवून दोन्ही भागांना समान न्याय देण्याचा दृष्टीने प्रयत्न करावे, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली आहे.
शिर्डीप्रमाणे नगर दक्षिणकडेही विमानतळ व्हावे
आता केवळ जिल्हा विभाजनाचीच मागणी होत नसून शिर्डीप्रमाणे नगर दक्षिणकडेही विमानतळ व्हावे, अशी मागणीही होऊ लागली आहे. विमानतळ झाल्यास सुपा एमआयडीसीत नवनवीन उद्योग येतील, सोबतच दक्षिण नगर जिल्ह्यातील मोहटादेवी देवस्थान, अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेकच्या महागणपती देवस्थान, मेहरबाबा देवस्थानचाही विकास शिर्डीप्रमाणे होईल, असं दक्षिणेकडील नेत्यांना आणि नागरिकांना वाटतंय. म्हणून विमानतळाची मागणी केली जात आहे. तर दक्षिण नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडून जेवढ्या ताकदीने जिल्हा विभाजनाची मागणी लावून धरली जाते तेवढ्या तुलनेत उत्तरेकडील नेते ही मागणी लावून धरताना दिसत नाही. त्या उलट उत्तरेकडील नागरिक देखील प्रशासकीय कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी मागणी करतात. मात्र, राज्यातील राजकारणात दक्षिण नगर जिल्ह्यापेक्षा उत्तरेला कायमच झुकतं माप मिळत राहिल्याने उत्तरेकडील नेते या मागणीकडे विशेष लक्ष देताना दिसत नाही.
आणखी वाचा