Shirdi News: नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या ‘शिर्डी महोत्सवा’त साईभक्तांचा अभूतपूर्व जनसागर उसळला. 25 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या नऊ दिवसांच्या कालावधीत देश-विदेशातून सुमारे 8 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या (Shirdi Saibaba) समाधीचे दर्शन घेतले. या काळात भाविकांनी श्रद्धेने तब्बल 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपये इतकी रेकॉर्डब्रेक देणगी (Donation) साई संस्थानच्या झोळीत अर्पण केली, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (Goraksh Gadilkar) यांनी दिली.

Continues below advertisement

महोत्सवाच्या काळात भाविकांनी विविध माध्यमांतून दान अर्पण केले. दानपेटीतून 6 कोटी 2 लाख 61 हजार 6 रुपये, देणगी काउंटरद्वारे 3 कोटी 22 लाख 43 हजार 388 रुपये, तर पीआरओ सशुल्क पासद्वारे 2 कोटी 42 लाख 60 हजार रुपये संस्थानला प्राप्त झाले. बदलत्या तंत्रज्ञानासोबत भाविकांनी डिजिटल देणगीलाही मोठी पसंती दिली. डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक आणि मनीऑर्डरद्वारे 10 कोटी 18 लाख 86 हजार 955 रुपये जमा झाले आहेत. 

Shirdi News: सोने-चांदीच्या स्वरुपातही दान

तसेच 26 देशांच्या परकीय चलनातून 16 लाख 83 हजार 673 रुपये संस्थानला मिळाले. सोने-चांदीच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणावर दान प्राप्त झाले. यामध्ये 293 ग्रॅम सोने (किंमत सुमारे 36.38 लाख रुपये) आणि सुमारे 6 किलो चांदी (किंमत 9.49 लाख रुपये) यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका साईभक्ताने बाबांच्या चरणी तब्बल 80 लाख रुपये किमतीचा आकर्षक सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण केला. या मुकुटामध्ये 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे आणि 586 ग्रॅम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे.

Continues below advertisement

Shirdi News: 6 लाखांहून अधिक भाविकांनी घेतला मोफत भोजनाचा लाभ

भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता साई संस्थानकडून दर्शन व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर अन्नदानाची परंपराही मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली. या नऊ दिवसांत 6 लाखांहून अधिक भाविकांनी साई प्रसादालयात मोफत भोजनाचा लाभ घेतला. तसेच 1 लाख 9 हजार भाविकांना अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले. याच कालावधीत 7 लाख 67 हजार लाडू पाकिटांच्या विक्रीतून 2.30 कोटी रुपये संस्थानला प्राप्त झाले, तर 5 लाख 76 हजार भाविकांना मोफत बुंदी प्रसादाचे वितरण करण्यात आले.

साई संस्थानला प्राप्त होणाऱ्या या देणग्यांचा उपयोग लोककल्याणासाठी केला जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले. साईबाबा रुग्णालय व साईनाथ रुग्णालयातील वैद्यकीय उपचार, मोफत भोजन व्यवस्था, शैक्षणिक संस्थांचे संचालन तसेच विविध सामाजिक आणि लोकहिताच्या उपक्रमांसाठी या निधीचा विनियोग केला जातो. महोत्सवाच्या काळात सर्व विभागांचे कर्मचारी, स्वयंसेवक आणि सुरक्षा रक्षकांनी भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा 

BMC Election 2026: किरीट सोमय्या आपला पोरगा बिनविरोध येण्याच्या आनंदात गाफील, आता ठाकरे बंधूंनी मुलुंडमध्ये लपवलेला एक्का बाहेर काढला