BMC Election 2026: शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) हे मुलुंडच्या वार्ड क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. नील सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) उमेदवार देण्यात आलेला नाही, यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. वार्ड क्रमांक 107 ची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली होती. परंतु राष्ट्रवादीचा अर्ज बाद ठरला. त्यामुळे नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे. आता शिवसेना ठाकरे गटाकडून नील सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार देण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे कट्टर विरोधक आहेत. किरीट सोमय्या हे फक्त आमचे शत्रू नसून ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ते महाराष्ट्र आणि मराठी द्वेष्टे आहेत. महाराष्ट्राच्या दुश्मनांना जर भाजप निवडणुकीत आणत असेल तर भाजपचे मनसुबे स्पष्ट होत आहेत. किरीट सोमय्यांच्या आतापर्यंतच्या सर्व भूमिका महाराष्ट्र विरोधी आहेत. त्यांनी शालेय शिक्षणामध्ये मराठीला देखील विरोध केला होता. त्यासाठी ते उषा मेहता यांच्यासोबत कोर्टात देखील गेले होते. महाराष्ट्रातील अनेक मराठी उद्योजक, मराठी राजकारण्यांच्या विरोधात किरीट सोमय्यांनी अमित शाह यांच्या सांगण्यावरून मोहीम उघडली. त्यातून आम्ही सगळे बाहेर पडलो. भारतीय जनता पक्षात सर्व भ्रष्टाचारी लोक गेल्यानंतर किरीट सोमय्या यांचे तोंड शिवले गेले, असा हल्लाबोल त्यांनी केला.
BMC Election 2026: नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत
संजय राऊत पुढे म्हणाले की, वार्ड क्रमांक 107 मध्ये जागा वाटपात त्या जागेचा हट्ट राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला. आम्ही त्यांना सांगितले होते की, ती जागा अत्यंत नाजूक आहे. आम्हाला ती जागा लढणे गरजेचे आहे. पण, त्यांनी सांगितले की, आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. आपण सगळे मिळून ती जागा जिंकू. मग नाईलाजाने आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली. त्यांच्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली. आम्ही सगळ्यांनी ठरवले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे उभे राहायचे. पण, नेहमीप्रमाणे जो बिनविरोध घोटाळा झाला त्यात 107 वॉर्ड देखील सामील झाला. त्यानंतर मुलुंडचे नाXX पोपटलाल बिनविरोध, बिनविरोध, माझ्याविरुद्ध कोणी नाही, असे नाचायला लागले. मात्र तसे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सुचल्यानंतर आमचे कडवट शिवसैनिक दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला आहे. त्यांचा अर्ज कायम आहे. उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत, हे पत्र दिलेले आहे. नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल. दिनेश जाधव यांना फक्त मशाल चिन्ह मिळू शकलेले नाही. त्यांचे चिन्ह दूरदर्शन संच आहे.पण, काटे की टक्कर होणार आहे. ते बिनविरोध येऊ शकत नाही. त्यांना आमच्याशी संघर्ष करावा लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय.
आणखी वाचा