Sanjay Raut अहमदनगर : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सगेसोयरेसह प्रमुख तीनही मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) उघड नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी सरकार हट्ट पुरवण्याचे काम करत आहे असे म्हणत सरकारला घरचा आहेर दिला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. 


अहमदनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, अहमदनगरमध्ये गुंडांचे राज्य सुरू झाले आहे. हे गुंड आता सरकारमध्ये सहभागी झालेत, अशी टीका त्यांनी संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता केली. आमच्या मुंबईत दाऊदच्या गँग जागेवर ताबे मारायचे. तशा प्रकारच्या जमिनीवर ताबा मारण्याचे प्रकार घडत असल्याचे मी ऐकले. ही परिस्थिती एखाद्या पक्षाच्या आमदारामुळे होत असेल तर राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत. 


...तर नगरच्या रस्त्यावर तमाशा होईल


नगरमध्ये देवस्थानच्या जागा लुटल्या गेल्यात. शैक्षणिक संकुलाच्या जागा इकडेच आमदार लुटत आहेत. त्यांनी निदान देवस्थानच्या जागा तरी सोडायला हव्यात, असा हल्लाबोल त्यांनी राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्यावर केला. या ताबा मारीवर आता छापामारी कशी करायची हे शिवसेनेला माहिती आहे. सरकारने ताबेमारी थांबवली नाही तर नगरच्या रस्त्यावर तमाशा होईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 


आता त्यांनीच सांगावं फसवणूक झाली की नाही


मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची फसवणूक झाली असेल तर स्वतः सांगावं. त्यांनी मुख्यमंत्र्यांना कडकडून मिठी मारली. आता त्यांनीच सांगावं की फसवणूक झाली की नाही. तुम्ही केलेल्या कामावर मतं मागा, देवाच्या नावावर मत मागू नका, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. 


कुणाचे ओरबाडून कुणाला देऊ नका


ओबीसी समाज नाराज असल्याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, कुणाचे ओरबाडून कुणाला देऊ नका, असे त्यांनी म्हटले. छगन भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.


नितीश कुमार यांचा राजीनामा देण्याचा छंद


महाविकास आघाडीची परिस्थिती उत्तम आहे. नितीश कुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेले तर आम्हाला काहीही फरक पडणार नाही. नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, तो त्यांचा छंद आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 


400 पारचा नारा असेल तर घाबरता?


अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटुराम आहे. सगळ्यात मोठे पलटूराम भाजप आहे. राहुल गांधींची यात्रा का रोखता, जर तुमचा 400 पारचा नारा असेल तर घाबरता? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे. 


सध्या भाजपला हरवायची वेळ


सध्या राज्यच गुंडगिरीवर सुरू आहे. नवीन सरकार आल्यापासून नगरच्या आमदारांची गुंडगिरी वाढली आहे. कुणाचा बॉस कुठे बसला आहे हे एकदा स्पष्ट होऊद्या. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. एकमेकांची जिरवायला भरपूर वेळ आहे. सध्या भाजपला हरवायची वेळ आहे.काँग्रेसने दक्षिण नगरची जागा लढवायला संधी दिली तर आम्ही नक्की लढू, आमच्याकडे खूप उमेदवार आहेत, असेदेखील यावेळी संजय राऊत म्हणाले.


आणखी वाचा 


मोठी बातमी! मनोज जरांगेंनी बोलावली गोदा पट्ट्यातील आंदोलकांची बैठक