Sanjay Raut On Bihar Politics :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्यात पुढाकार घेणारे जनता दल युनायटेडचे  नितीशकुमार (Nitishkumar) आता बिहारमध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि महाआघाडीसोबत काडीमोड घेत नितीशकुमार हे पुन्हा एकदा भाजपसोबत घरोबा करणार आहे. नितीशकुमार यांना पुन्हा एकदा पलटूराम म्हटले जात असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फक्त नितीशकुमारच पलटूराम नाही असे म्हणत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. 


अहमदनगर येथील वंजारवाडीत संजय राऊत आले होते. संजय राऊत यांना वंजारवाडी येथे संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राऊत यांनी म्हटले की, पलटूराम फक्त नितीशकुमार नाहीत. तर पहिले पलटूराम भाजपा आहे. नितीश कुमार आमच्या दारात उभे राहिले तरी त्यांना भाजपमध्ये घेणार नाही अशी वक्तव्य भाजप नेत्यांनी केली होती. त्यामुळे खरी पलटुराम भाजपच आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. 


नितीशकुमार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याची दाट शक्यता असून रविवार, 28 जानेवारीचा दिवस बिहारसाठी महत्त्वाचा असणार आहे. नितीशकुमार राजदसोबत काडीमोड घेणार असून भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. एकाच पंचवार्षिकमध्ये नितीशकुमार हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 


भाजप ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार?


भाजप पुन्हा एकदा ठाकरेंना सोबत घेणार का, असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी म्हटले की, भाजपला काही साक्षात्कार झालाय का? आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह नाही. काय म्हणून आम्हाला सोबत घेतील अशी उपरोधिकपणे राऊत यांनी म्हटले. बिहारच्या राजकारणात उलथापालथ होत असल्याची चर्चा सध्या होत आहे. नितीश कुमार यांना भाजप सोबत घेत असतील आणि भाजप जर जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेण्याच्या प्रयत्न करत असेल तर शिवसेना भाजप सोबत जाणार का या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.


मराठा आरक्षण निर्णयाचा आनंद घेऊ द्या, त्रुटीवर नंतर बोलू


मराठा आरक्षणाचा आजच निर्णय झालाय त्यांना आनंद घेऊ द्या. काही त्रुटी असतील तर नंतर बोलता येईल. मात्र राज्यातील एखादी समस्या सुटली असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले.