मुंबई : एकीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या (Sharad Pawar Ajit Pawar Meet) वारंवार कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी होत असतानाच दुसरीकडे आणखी एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताचे जामखेडमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे एकच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. 

Continues below advertisement


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा संध्या सोनवणे यांच्यावतीने शिव शाहू फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे गुरुवारी जामखेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. 


रोहित पवारांच्या नावे बॅनर


अजित पवार जामखेड मध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागताचे अनेक बॅनर लागले आहेत. त्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मित्र परिवार अशा नावाने अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. 


शरद पवार-अजित पवार पुन्हा एकत्र बैठक


शरद पवार आणि अजित पवार हे दोन नेते गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा एकत्र भेटणार आहेत. 21 एप्रिलला एआय संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल येथे सकाळी 9 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. त्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र भेटणार आहेत.


याआधी साताऱ्यात रयत संस्थेच्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्रित दिसले होते. अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने शरद पवार आणि पवार कुटुंबीय एकत्रित दिसले होते. बारामतीमधील एका बैठकीतही या दोन्ही नेत्यांनी एकाचवेळी उपस्थिती लावली होती. त्याचीही राज्यभर चर्चा झाली होती. आताही हे दोन दिग्गज नेते एकत्रित बैठकीला उपस्थित राहणार आहेत.


राष्ट्रवादीमध्ये फूट जरी पडली असली तरी काही ना काही निमित्ताने दोन्ही गटांचे नेते एकमेकांना भेटतात, त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवला आहे. शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचं दोन्ही गटांकडून सांगितलं जातं. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी अनेकदा चर्चा रंगते. पिंपरीतील एका कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचं वक्तव्य केलं होतं. 


ही बातमी वाचा : 



  • हॅटट्रिक बरका... शरद पवार अन् अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र येणार; नवा कार्यक्रम, ठिकाण अन् वेळही नवी