Ahmednagar Crime News : राज्यात एकामागून एक गोळीबाराच्या आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात देखील असाच काही प्रकार समोर आला आहे. अहमदनगर (Ahmednagar) शहरातील गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर कॉलनीत एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून, यात तो जखमी झाला आहे. शहरातील बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी (वय 53 वर्ष)  यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी तलवार यासारख्या हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला आहे. तसेच, घटनास्थळी एक गावठी कट्टा देखील मिळून आला आहे. व्यापाऱ्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करत असतांना झटापटीत पिस्तुल खाली पडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. 


अहमदनगरमधील या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून, या प्रकरणी तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे. या प्राणघातक हल्ल्याने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


दुचाकीवरुन घरी निघाले असतानाच केला हल्ला...


अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास धीरज जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जोशी हे शहरातील किर्लोस्कर वसाहतीत राहतात आणि त्यांचे शहरात रामचंद्र खुंट येथे मिठाईचे दुकान आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे ते रात्री दुकान बंद करून दुचाकीवरुन घरी निघाले होते. याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. त्यांच्यावर हातावर वार करण्यात आले. विशेष म्हणजे हल्लेखोरांकडे एक गावठी कट्टा देखील होता, मात्र झटापटीत तो खाली पडल्याने त्यांना गोळीबार करता आला नाही. 


पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडलेल्या घटनास्थळी तलवारीसारखी एक वस्तू व पिस्तूल मिळून आली आहे. जोशी यांच्यावर हल्ला केल्यावर हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचेसह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. हल्ल्याचे कारण समजू शकलेले नाही, मात्र पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. यासाठी पोलिसांचे पथक नेमण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सोबतच गुन्हे शाखेच्या पथकाकडून देखील या हल्लेखोरांचा शोध घेतला आहे. तसेच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nagpur Crime News: खळबळजनक! 24 तासात दोन हत्येच्या घटनांनी शहर हादरले; उपराजधानीत हत्यासत्र सुरूच