Ram Navami 2025 : रामनवमीनिमित्त अहिल्यानगर (Ahilyanagar News) शहरातून हिंदुत्ववादी संघटनांनी भव्य शोभायात्रेचे आयोजन केले आहे. 2015 पासून हे शोभायात्रेचे आयोजन केले जाते. मात्र 2015 ला शहरातील एका भागात या शोभा यात्रेदरम्यान वाद झाल्यामुळे पोलिसांनी यात्रेचा मार्ग बदलला होता. 2016 ते 2024 पर्यंत पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गावरूनच रामनवमीची शोभायात्रा जात होती. मात्र यावर्षी पुन्हा हिंदुत्ववादी संघटनांनी जुन्या मार्गावरून शोभायात्रा काढणारच असा हट्ट धरला आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी दिलेली नाही. आता ही मिरवणूक नक्की कोणत्या मार्गाने जाणार? याकडे नगरवासियांचे लक्ष लागले आहे.
रामनवमीच्या मिरवणुकीबाबत पोलीस प्रशासन, हिंदुत्ववादी संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फैरी झाल्या आहेत. मात्र, यातून कुठलाही तोडगा निघालेला नाही. अखेर आता पोलीस प्रशासनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना ही जुन्याच मार्गावरून मिरवणूक घेऊन जाणार यावर ठाम राहिलेले आहे.
मिरवणुकीसाठी पोलीस दल सज्ज
त्यामुळे आता मिरवणुकीसाठी पोलीस दल सज्ज झाले असून एक पोलीस अधीक्षक, दोन डीवायएसपी, सात पोलीस निरीक्षक, 30 पोलीस उपनिरीक्षक, एक एसआरपीची पलाटून तसेच शीघ्र कृती दलाची एक प्लाटून, दीडशे होमगार्ड असा जवळपास 600 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पोलिसांनी बंदोबस्तासाठी आपली शस्त्रास्त्रे तयार ठेवली असून रामनवमीनिमित्त मिरवणुकी दरम्यान मिरवणूक कुठून जाणार? याकडे नगरवासियांचे लक्ष लागले आहे. मात्र, पोलिसांनी "हम भी है तयार" ची भूमिका स्पष्ट केलीय.
मिरवणूक मार्ग नो व्हेईकल झोन
मिरवणूक मार्गावर अनेक चौकामध्ये स्टेज टाकून व ध्वनिक्षेपक लावून श्रीराम जयंतीत्सव साजरा करण्यात येणार आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. आजच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीक सामील होणार आहेत. या नागरीकांचे सुरक्षिततेस सार्वजनिक वाहतुकीमुळे धोका निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्या करीता मिरवणुकीचे मार्गावरील वाहतुकीचे विनीयमन करणे आवश्यक असल्याने पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी मिरवणुकीचा मार्ग नो व्हेईकल झोन जाहीर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, इम्पेरिअल चौक माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, बॉम्बे बेकरी चौक चाँद सुलताना हायस्कुल माणिक चौक भिंगारवाला चौक, कापडबाजर, तेलीखुंट, नेता सुभाष चौक - चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट या मार्गावर हा झोन लागू असणार आहे.
222 जण हद्दपार
श्रीराम नवमी मिरवणुकीत 2015 मध्ये वाद झाला होता. त्यावेळी मिरवणुकीसाठी परवानगी घेतली नव्हती, असे पोलीस प्रशासन सांगत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रित राहावा, यासाठी पोलीस व प्रांताधिकाऱ्यांनी शहरातील सुमारे 222 जण एक दिवसाकरिता हद्दपार केले आहेत. त्यांच्याविरुद्ध गंभीर तर हिंदू-मुस्लिम असे जातीय गुन्हे आहेत. त्यात तोफखाना 88, कोतवाली 74, भिंगार कॅम्प येथील 60 जणांचा समावेश आहे.
आणखी वाचा