अहमदनगर : सरकार कोणाचेही असले तरी आम्हाला भांडावं लागणार आहे.शेतकरी सरकारकडे जगावेगळे काही मागत नाही. आम्ही दुधाला चाळीस रुपये हमीभाव मागतोय. लोकसभेला (Lok Sabha Election) फटका बसला, विधानसभेला (Vidhansabha Election) फटका बसायची वाट पाहू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सरकारला दिला आहे. 


दुधाला किमान 40 रुपये दर मिळावा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) शहरात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी सहभागी होत नगर-मनमाड महामार्ग रोखला. बैलगाडी व गाया घेऊन शेतकरी आंदोलनात आले होते. पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एल्गार केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


किती वर्ष आमच्या आई-बहिणीने शेणामध्ये हात घालायचे?


यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, सरकार कोणाचेही असले तरी आम्हाला भांडावं लागणार आहे. मी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतोय. अनेक सरकारं आली आणि गेली. मात्र संघर्ष अद्याप संपलेला नाही. शेतकरी सरकारकडे  जगावेगळे काही मागत नाही. पशुखाद्याच्या किमती वाढल्या, चारा वाढला, मजुरांचीही संख्या कमी झाली. गाय विकता येत नाही आणि दूध धंदाही तोट्यात आहे, अशी शेतकऱ्याची अवस्था झाली. किती वर्ष आमच्या आई-बहिणीने शेणामध्ये हात घालायचे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.  


लोकसभेला फटका बसला, विधानसभेला बसायची वाट पाहू नका


ते पुढे म्हणाले की, आम्ही जगावेगळे काही मागत नाही. चाळीस रुपये हमीभाव मागतोय. दूध भुकटी भाव पडले की पाडले? हे मला माहित नाही. मात्र या कंपन्यांनीच दुधाचा खेळखंडोबा करून ठेवलाय. जर आयात केलेली दूध भुकटी आली तर दुधाचे भाव 20 रुपयांपेक्षाही कमी होतील. अनुदान देताना आडकाठी घातल्या जातात. टक्कल असणाऱ्या माणसाला चांगला कंगवा दिला जातो, अशी अवस्था आहे. अनुदान देताना कुठली अट ठेवू नका. अनुदान थेट शेतकऱ्याच्या नावावर जमा करा. लोकसभेला फटका बसला, विधानसभेला फटका बसायची वाट पाहू नका. दूध दराची बैठक घेताना कोणाला बोलवायचं याची काळजी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे. चार वर्षांपूर्वी सुद्धा अर्थसंकल्पात अनुदानाची तरतूद केली. किती जणांना पैसे मिळाले? कसा ठेवायचा अजित दादांवर तरी विश्वास? सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय. कांदा निर्यात, साखर धोरण, दूध दर, शेतमालाला हमीभाव यात कुठेही सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नाही, अशी टीका त्यांनी यावेळी सरकारवर केली आहे. 


आणखी वाचा 


वीज बिल माफीच्या निर्णयाचं स्वागत, पण कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकारला फायदा : राजू शेट्टी