अहमदनगर : आठ लाखांच्या लाच मागणी प्रकरणात फरार असलेले अहमदनगर मनपाचे आयुक्त पंकज जावळे (Pankaj Jawale) यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीये. पंकज जावळे यांनी त्यांच्या कार्यकाळात ठराव करून घेतलेल्या प्रकरणाचा अहवाल आता शासनाने (Government) मागविला आहे. 


आयुक्त जावळे यांनी त्यांच्या कार्यकाळात स्थायी समितीची 88 ठराव आणि सर्वसाधारण सभेचे 34 ठराव महापालिका अधिनियकमातील तरतुदीचे उल्लंघन करून केले असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली होती. या मागणीनुसार शासनाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धारम सलीमठ यांना पास करण्यात आलेल्या एकूण ठरावासंदर्भात अहवाल मागविला आहे. तसा आदेशचं शासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.


नेमकं प्रकरण काय? 


अहमदनगर महानगरपलिका आयुक्त पंकज जावळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता नगरसचिव मेहेर लहारे यांना हाताशी धरून स्थायी समितीचे प्रशासकीय 78 ठराव, साधारण सभेचे 34 ठराव, अशा एकूण 112 ठरावांना बेकायदेशीर मान्यता दिलेली आहे. त्या ठराव मध्ये अनेक विषय धोरणात्मक ठरावावर  सुचक अनुमोदक याचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. लहारे यांच्याकडे नगरसचिव या पदाचा तात्पुरते स्वरूपात प्रभारी पदभार असताना त्यांनी ठरावावर प्रभारी असे न लिहता स्वाक्षरी केलेले आहे. ठरवात विभागाच्या प्रशासकीय प्रस्तावाचा दिनांक नमूद करण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची चौकशी करून ठराव खंडित करावे. जावळे आणि लहारे यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी. जावळे यांच्याकडील प्रशासक या पदाचा पदभार काढून शासन सेवेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शासनाने वर्ग करावे, अशी मागणी नगर विकास विभागाकडे शेख यांनी केली होती. त्याची दखल घेऊन शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेश काढण्यात आले आहे. यामुळे पंकज जावळे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 


आयुक्त पंकज जावळे फरार 


अहमदनगर पालिका लिपिक शेखर देशपांडे याच्याकडून ही 8 लाखांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची एसीबीकडे तक्रार गेल्यानंतर एसीबीने कारवाई सुरू केली. एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिक शेखर देशपांडेच्या बुऱ्हाण नगरमधील घरावर एसीबीकडून छापा टाकण्यात आला आहे. तर आयुक्ताचं राहतं घर लाचलुचपत विभागानं सील केलं आहे. 


आणखी वाचा 


Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?