Radhakrishna Vikhe Patil on Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल गीतातून (Shiv Sena UBT Mashal Song) जय भवानी (Jai Bhavani) हा शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस पाठवली. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार टीका केली. 


आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या गीतातील जय भवानी शब्द काढणार नाही. जय भवानी, जय शिवाजी ही आमची घोषणा आहे. आज तुम्ही आमच्या घोषणेतील जय भवानी शब्द तुम्ही काढायला लावत आहात, उद्या तुम्ही जय शिवाजी शब्द काढायला लावाल, ही हुकूमशाहीची पद्धत आम्ही स्वीकारणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 


उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी फारकत घेतली


राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळे ते कुठलेही बेताल वक्तव्य करतात. त्यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली आहे. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्याच आहे. शेवटी हे कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या राज्यामध्ये दिलेले निर्देश हे पाळलेच पाहिजे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 


वडाळा येथील प्रकार अतिशय गंभीर 


नेवासा तालुक्यातील वडाळा येथील एमजेएफ रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिला रुग्णांबाबत घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून हॉस्पिटलची क्षमता नसताना एवढ्या महिला तिथे गेल्या कशा? हा खरा प्रश्न आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशी करायला हवी. सुदैवाने तिथे कोणतेही जीवितहानी झाली नाही पण हा प्रकार गंभीर असल्याची प्रतिक्रिया अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी दिली आहे.


राधाकृष्ण विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा


परभणीच्या पाथरी येथे महसूल कर्मचाऱ्यांना वाळू माफियाने मारहाण केली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय याबाबत बोलताना राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखेंनी महसूल कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळणं गरजेचं असल्याचे म्हंटले आहे. आचारसंहितेचा फायदा घेऊन वाळू माफियांनी पुन्हा उच्छाद मांडायला सुरुवात केलीये. मात्र मागील महसुलमंत्र्यांनी वाळू माफियांना जो राजाश्रय दिला त्यामुळेच राज्याला ही कीड लागले असल्याचे म्हणत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर निशाणा साधला. वाळू माफियांचा उच्छाद मोडून काढण्याचा आम्ही मागच्या वर्षभरापासून प्रयत्न करत असल्याचा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्यानेच ‘जय भवानी’ शब्द काढायला लावला असेल, चित्रा वाघ यांची खोचक टीका