शिर्डी : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) सध्या महाराष्ट्राचे वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आंदोलक आता थेट नेतेमंडळींना अडवून मराठा आरक्षणाबाबत जाब विचारत आहेत. काल भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना नांदेडमध्ये मराठा आंदोलकांनी घेरलं. या पाठोपाठ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे बार्शी दौऱ्यावर असताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. यावरून आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. 


महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शिर्डी मतदारसंघातील राहाता बाजार समितीत 10 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन सोहळा पार पडला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 


लोकांना तुम्ही किती काळ फसवणार? 


मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार चार वेळेला मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र ते आरक्षणाबद्दल का बोलत नाहीत. शरद पवारांची भूमिका दुटप्पी आहे. लोकांना तुम्ही किती काळ फसवणार आहात? आरक्षणाबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे. पवारांकडून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. 


राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका योग्य


राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या टाकल्याने मनसेच्या जिव्हारी लागले होते. यानंतर ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,  राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका राज्याच्या भविष्यासाठी आहे. उध्दव ठाकरे फक्त फेसबुक मुख्यमंत्री होते. राज्यातील जनता वाऱ्यावर होती. महाराष्ट्र किती काळ हे सहन करणार आहे. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे, असे त्यांनी सांगितले. 


रोहित पवारांनी हा प्रश्न शरद पवारांना विचारावा


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचं कर्तृत्व काय? मला त्यांचा इतिहास बघायचाय. तुम्ही कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, अशी जोरदार टीका आमदार रोहित पवार यांनी केली. यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, रोहित पवारांनी हा प्रश्न शरद पवारांना विचारावा. त्यांनी संपूर्ण हयातीत किती कुटुंब फोडले, किती कुटुंब उद्ध्वस्त केले, किती कुटुंबांना राजकारणातून संपवले? रोहित पवारांनी त्यांच्या आजोबांना हा प्रश्न विचारावा, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


शरद पवारांची यांची गाडी मराठा आंदोलकांनी रोखली, मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी