नेवासा (अहमदनगर) : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) आपल्या प्रत्येक सभेतून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, येवल्यात गावबंदीचे होर्डिंग फाडण्यात आल्याचे आरोप करत जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोबतच, भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम असल्याचा इशारा देखील दिला आहे. 


यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "मराठ्यांना आरक्षण म्हंटले की विरोध चालू झाला. अनेकजण मराठा खेकड्यासारखा असल्याचे म्हणायचे, पण आता करोडो बांधव एकत्र आले आहे. ही लाट आता थांबणार नाही. तो म्हातारा कसंही बरळत आहे. आपण कोणाचं नाव घेत नाही, त्याची लायकी देखील नाही की  आपण त्याचं नाव घ्यावेत. सर्वांचं खातो आणि म्हणतो मी खात नाही. येवल्यात आमचे बोर्ड फाडले असे कळते, अजित दादाला सांगतो त्याला समजावून सांगा. अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल, नाहीतर आमच्या नावाने खडे फोडू नका.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही सांगतो. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर आमचे बोर्ड फाडले असतील, तर मग आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल. तुम्हाला हे जड जाईल आधीच सांगतो. चिल्लर चाळे करू नको म्हणून त्याला सांगत आहे. सरकारला देखील हे जड जाऊ शकते, गंभीर्याने घ्या, सरकारला त्रास होईल. येवल्यात मराठा बांधवांचे गावबंदीचे बोर्ड फाडल्यावरून जरांगे यांनी सरकारला ईशारा दिला आहे. 


आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू नका


याला (भुजबळ) दोन-तीन दिवसांत शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम आहेत. फडणवीस यांनी त्याला समज द्यावी, आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करू नका. तसेच, मराठ्यांना आवाहन आहे,  आरक्षणाची अशी संधी परत येणार नाही. त्यामुळे सध्या शांत रहा, आम्हाला आरक्षण येऊ द्या मग पाहतो हा कुठे पळतो. आता होर्डिंग फाडल्याचे व्हडिओ काढून ठेवा. नंतर बघू हा एकाच गल्लीत आहे, असे जरांगे म्हणाले. 


नाहीतर आमचाही नाईलाज होईल 


पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, "मी शांत बसलो की, हा (भुजबळ) सुरू करतो. गोरगरिबांचा तळतळाट लागल्याने जेलमध्ये गेला. राज्य पुन्हा दुषित करण्याचे काम यांनी केले आहे. खायची किती हौस आहे. सरकारला आवाहन करतोय आणि अजित दादांना सांगतोय. हा माणूस जातीय तेढ निर्माण करतोय. याला रोखा, कार्यकर्त्यांना होर्डिंग फाडायला लावत आहे. आता मी शांत बसणार नाही, कारण मी गद्दार नाही. मराठा तुम्हाला शांत करायला सज्ज झाले आहेत. तुम्हीच त्याला पाठिंबा देताय का?, शेवटची विनंती सरकारला करतो. नाहीतर आमचाही नाईलाज होईल," असेही जरांगे म्हणाले. 


अधिवेशनाचे दिवस वाढवले... 


24 तारखेपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी निघणार आहे. मराठा तरुणांनी दिलेलं बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. 7 ते 22  डिसेंबरपर्यंत अधिवेशन आहे. मात्र, आता 29 पर्यंत तारीख पुढे गेल्याचे कळत आहे.  बहुतेक आपल्या मुद्द्यासाठीच आणखी तारीख वाढवली आहे, असेही जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, मनोज जरांगे यांचा मोठा दावा; राजकीय वातावरण तापणार