अहमदनगर : बदलापूरमधील एका शाळेत (Badlapur School Case) 13 ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक देण्यात आली आहे. यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे.
राधाकृष्ण विखेंचा सवाल
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ही घटना दुर्देवी आहे. त्याचा सर्व घटकातून निषेध झालाय. त्या घटनेचं राजकीय भांडवल करण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. बदलापूरमध्ये जी कारवाई करायची ती सरकारने केलीय. पश्चिम बंगालमध्येही इतकी मोठी घटना घडली. त्याचे जगात पडसाद उमटले आहेत. आज आघाडीचे लोक ज्या तत्परतेने बदलापूर गेले. त्या पद्धतीने बंगालच्या घटनेसाठी का बंद पुकारला नाही? त्या घटनेचा निषेध का केला नाही? याचा अर्थ आघाडीच्या नेत्यांना ममता बॅनर्जीच्या पदराखाली लपायचं आहे. आघाडीची दुटप्पी भूमिका आता जनतेसमोर आल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
संजय राऊतांच्या टिकेकडे लक्ष देऊ नका
बदलापूरच्या घटनेवरून टीका करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संशयी आत्मा आहेत, असे म्हटले. याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, संजय राऊतांच्या टिकेकडे लक्ष देऊ नका. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. संवेदनशील घटनेत ते अशा प्रतिक्रिया देत आहेत. त्यांनी जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
आम्ही आरशात दिसण्याची का वाट बघताय?
24 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला जनता त्यांचा खरा आरसा दाखवणार, असे म्हटले होते. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आम्ही आरशात दिसण्याची का वाट बघताय? सगळ्या ठिकाणी आम्हीच तुम्हाला दिसतोय. कारण हे काम करणारं सरकार आहे. तुमच्याकडं कोणी पाहत नाही म्हणून तुम्ही बदलापूरच्या घटनेचा केविलवाणा राजकीय प्रयत्न करताय हे दुर्दैवी असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे.
आणखी वाचा