SI Dilbag Singh Car Bomb: पंजाबमधील (Punjab Police ) एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखाली बॉम्ब लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक समोर आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीला महाराष्ट्रातील शिर्डीमधून (Maharashtra Shirdi Police) अटक करण्यात आली आहे. 16 ऑगस्ट रोजी पंजाबमध्ये एसआय दिलबाग सिंह यांच्या वाहनाच्या खाली आयईडी बॉम्ब लावल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी एटीएसच्या मदतीने राजेंद्र नावाच्या व्यक्तीला महाराष्ट्रातील शिर्डीमधून अटक केली आहे. पंजाब पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करून आरोपींना अटक केली आहे. या आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


माहितीनुसार पंजाबचे पोलीस अधिकारी दिलबाग सिंह (SI Dilbag Singh) यांच्या कारमध्ये आयईडी बॉम्ब पेरण्यात आला होता. या प्रकरणी आधी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना दिल्ली विमानतळावरून पकडण्यात आले होते. हे दोन्ही संशयित परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. 


16 तारखेला रात्री पंजाबच्या अमृतसरमध्ये पोलीस अधिकारी दिलबाग सिंह यांच्या घराखाली असलेल्या गाडीखाली बॉम्ब लावून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला होता. ज्यामध्ये दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांनी त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारखाली स्फोटके पेरल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते. 


सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलं वेगळंच सत्य
दिलबाग सिंह हे दहशतवादविरोधी कारवायांमध्ये खूप सक्रिय आहेत आणि कदाचित याच कारणामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात पांढरे कुर्ते घातलेले दोन अनोळखी लोक कारच्या तळाशी बॉम्ब ठेवताना दिसून आलेत. या घटनेपूर्वीही दिलबाग सिंह यांना अनेकदा धमक्या आल्या होत्या आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. दिलबाग सिंह यांनी सांगितलं की,  मी दहशतवादाविरोधात काम केले होते. आधी 5 जून रोजी धमक्या मिळाल्या होत्या.  दिलबाग सिंह म्हणाले होते की, आमच्या कार वॉश करणाऱ्या व्यक्तिनं सांगितलं की, कारखाली काहीतरी आहे, त्यानंतर ती वस्तू म्हणजे बॉम्ब असल्याचे समोर आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, दुपारी 2:03 च्या सुमारास 2 व्यक्ती काही वस्तू घेऊन निघून जात आहेत, तपासादरम्यान ते आयईडी असल्याचे आढळून आले. 


प्रकरणाच्या तपासासाठी अनेक पथके तैनात 


या प्रकरणी एडीजीपी आरएन ढोके यांनी सांगितले की, या बॉम्बमध्ये सापडलेल्या आयईडीचे वजन सुमारे अडीच किलो आहे. तरनतारन येथून जप्त करण्यात आलेला आणि पाकिस्तानमधून आलेला हा आयईडी असल्याचं दिसतंय. या प्रकरणाची आम्ही दहशतवादाच्या अॅंगलनं देखील तपास करत आहोत. या प्रकरणी तपासासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत, असं त्यांनी सांगितलं.  दिलबाग सिंह हे एक क्षमतावान अधिकारी आहेत. त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. आम्ही त्यांच्या सुरक्षेत वाढ करत आहोत, असं ते म्हणाले.