अहमदनगर : खोटी प्रमाणपत्रं सादर केल्यामुळे बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दिलीप खेडकरांनी हे 'मैं हु डॉन', 'बाप तो बाप ही रहेगा' या गाण्यांवर चांगलाच ठेका धरल्याचं दिसून आलं. दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी असून त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत.
मैं हु डॉन... आणि बाप तो बाप ही रहेगा.... या दोन गाण्यांवर दिलीप खेडकर यांनी केलेला डान्स हा भालगाव या त्यांच्या मूळ गावातील आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगाव मधील गणपती विसर्जन मिरवणूकीत केलेला हा डान्स आहे. दिलीय खडेकर यांना शेतकऱ्यांना धमकावल्याच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. तर यूपीएससीची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे.
कोण आहेत दिलीप खेडकर?
पूजा खेडकर प्रकरणात त्यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत. दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी असून पाथर्डी तालुक्यातील भालगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. बी ई (मेकॅनिकल) शिक्षण झालेले दिलीप खेडकर यांनी सनदी अधिकारी म्हणून राज्य शासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
दिलीप खेडकर सेवानिवृत्त होताच त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना 13 हजार 749 मते मिळाली होती.
दिलीप खेडकर यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात 40 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केलं आहे. त्यानंतर एका सनदी अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कशी असू शकते, याबाबत राजकीय चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे दिलीप खेडकर यांची पत्नी डॉ.मनोरमा खेडकर यांनी देखील लोकसभा निवडणूक अर्ज भरला होता. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच होत्या. मनोरमा खेडकर यांचे वडील जगन्नाथ बुधवंत हे देखील सनदी अधिकारी होते. त्यांची कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली होती. त्यांचे एकदा निलंबनही झाले होते.
दिलीप खेडकर यांना दोन अपत्य आहेत. पियुष खेडकर आणि पूजा खेडकर. पियुष खेडकर हा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. तर पूजा खेडकर आता आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
पूजा खेडकर सेवेतून बडतर्फ
बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचं समोर आलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. आता तिला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: