अहमदनगर : अधिकारी नवीन असो वा जुना, त्याचं वर्तन चांगलंच पाहिजे, पुजा खेडकरांनी (Pooja Khedkar) असं वागायला नको होतं अशी प्रतिक्रिया अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी दिली आहे. पूजा खेडकरांच्या वर्तनाची वरिष्ठ वातळीवर दखल घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पूजा खेडकर या निवृत्त आयएएस अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या असून दिलीप खेडकरांनी निलेश लंके यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. 


अधिकाऱ्यांनी चांगलं वागलं पाहिजे


प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर या मागील काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. याबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले की, नवीन अधिकाऱ्यांची अशी वागणूक बरी नाही, त्यांनी असं वागायला नको होतं. त्यांच्या वडिलांचीदेखील सर्व्हिस झाली आहे. जुना असो की नवा अधिकारी असो, त्यांची वर्तवणुक चांगली असावी. अन्यथा वरिष्ठ पातळीवर याची दखल घ्यायला हवी.


कब्बडीच्या निवडणुकीत निलेश लंकेंना शह


राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक 21 जुलैला होत आहे. या निवडणुकीसाठी मतदार म्हणून पाठवलेली खासदार निलेश लंके आणि सच्चिदानंद भोसले यांची नावे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंतिम यादीतही बदल अहवाल वेळेत न दिल्याचे कारण देत अवैध ठरवली आहेत. राजकीय डावपेचात सरस असलेले लंके यांना कबड्डीच्या डावात मात्र शह मिळाला आहे. याबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले की, जरी आमची नावे अवैध ठरवली असली तरी ती चुकीच्या पद्धतीने अवैध ठरविण्यात आलेली आहे. याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे.


दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? असं निलेश लंके यांना विचारले असता, आपण त्या खोलात गेलेलो नाही, मात्र न्यायालयात आम्ही न्याय मागितला आहे असं ते म्हणाले. 


शरद पवारांएवढा अभ्यास कुणाचा नाही


येऊ घातलेल्या विधानसभेला 288 पैकी आमच्या 225 जागा येतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. यावर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यात शरद पवारांइतका अभ्यास कोणाचा नाही. त्यामुळे शरद पवार जे बोलतात ते सूचक वक्तव्य असतं आणि ते प्रत्यक्षात देखील अमलात आणतात. अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीची लाट राहील.


कांदा आणि दुधाला हमीभाव मिळावा यासाठी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोरतीन दिवस आंदोलन केले होते. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत लक्षवेधी प्रश्न विचारला. त्यामुळे काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 


निलेश लंके यांच्या आंदोलनाच्या वेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत पाटील यांनी आंदोलनाला भेट दिली होती. यावेळी लंके यांच्या मागण्या मार्गी लावू असं आश्वासन देत विखे यांनी वेळ मागितला होता. तसेच उत्पादन खर्चावर दर ठरवायचा असेल तर कायदा करणे अपेक्षित असून, अनुदान देण्यापेक्षा दुधाला भाव वाढून दिले पाहिजे यासाठी त्यांनी मुदतवाढ मगितल्याचं लंके यांनी सांगितले.


आयुक्तांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार


अहमदनगर मनपा आयुक्त पदाचा पदभार यशवंत डांगे यांनी आज स्वीकारला. मात्र यावर खा.निलेश लंके यांनी आक्षेप नोंदवला आहे. या आधीचा अधिकारी भ्रष्टाचारी होता आणि नव्यानं आलेला अधिकारी त्याच तोडीचा असल्याची चर्चा आहे, त्यामुळे याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे निलेश लंके यांनी म्हटलं आहे.


ही बातमी वाचा :