Ahmednagar Crime News : अहमदनगर (Ahmednagar) शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला ब्लॅकमेल (blackmail)करुन पैसे उकळण्याच्या उद्देशाने सिराज खान या आरोपीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी सिराज खान आणि फिर्यादी राजेंद्र बहुधने यांच्यावर काही वर्षांपूर्वी डॉ. प्रदीप तुपेरे यांच्या दावाखान्याबाहेर असलेल्या अतिक्रमण काढण्यावरुन सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा डॉक्टरांमुळेच आपल्यावर दाखल झाला असल्याचे म्हणत आरोपी सिराज खान हा डॉ. तुपेरे यांना ब्लॅकमेल करुन पैसे उकळत होता. तर आता पुन्हा डॉक्टरला भीती दाखवून डॉक्टरांकडून अजून पैसे उकळण्याचा डाव सिराज खान याने आखला. पण अखेर हे सर्व प्रकरण समोर आले आहे.
नेमकी घटना काय?
आरोपी सिराज खानने कट करुन डॉक्टर तुपेरे आणि त्यांच्याच दवाखान्यात पूर्वी काम करणाऱ्या राजेंद्र बहुधने यांना स्वतःच्या मालकीच्या मशिरा फिश अॅन्ड बर्ड हाऊस येथे घेऊन गेला. त्या ठिकाणी राजेंद्र बहुधने यास मारहाण करुन सिराज खान याने राजेंद्र बहुधने याच्यावर गोळी झाडण्याचे नाटक करत ही गोळी जमिनीवर फायर केली. तीच बंदूक राजेंद्र बहुधने यांच्या हातात देऊन त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉ. प्रदीप तुपेरे यांना दम देऊन सांगितले की , पोलिस आल्यावर सांगायचे की राजेंद्र बहुधने यानेच माझ्यावर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गोळीबाराचा आरोप हा डॉक्टरांकडेच पूर्वी काम करणाऱ्या बहुधने याच्यावर जाईल आणि या सर्व प्रकारामुळे डॉक्टर घाबरुन आपल्याला पैसे देतील असं सिराज खान याला वाटले. मात्र, ही घटना घडल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर डॉ. प्रदीप तुपेरे यांनी सिराज खानने सांगितल्यानुसार पोलिसांनी जबाब देण्यास सुरुवात केली होती. मात्र, डॉ. प्रदीप तुपेरे जबाब देत असताना अनेक वेळा अडकले आणि त्याच ठिकाणी पोलिसांना संशय बाळगला. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सर्व संशीयतांची वेगवेगळ्या खोलीत घेऊन विचारपूस केली असता हा सर्व बनाव असून डॉ. तुपेरे आणि राजेंद्र बहुधने यांनी भीतीपोटी सर्व प्रकरण आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न केला होता हे समोर आले.
सिराज खानसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल
दरम्यान, मुख्य आरोपी हा सिराज खान हाच असून त्याने डॉक्टर आणि बहुधने यांना धमकी देऊन पोलिसांसमोर वेगळा जबाब द्यायला सांगितल्याचे समोर आले आहे. त्यामुळं रात्री उशिरा याप्रकरणी राजेंद्र बहुधने याच्या फिर्यादीनुसार सिराज खान, मोईन खान, निसार यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या: