Rohit Pawar Letter to PM Modi : कर्जत- जामखेड (Karjat Jamkhed) विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी (MIDC) व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही (Assembly Monsoon Session) त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवार (10 ऑगस्ट) रोजी त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी कर्जत पोस्टातून पंतप्रधानांना हे पत्र पाठवलं आहे. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं. जर राज्य सरकारकडे अनेकदा पाठपुरवठा करुनही काही होत नसेल तर आता देशाच्या नेतृत्वाकडे विनंती करण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
'आता देशाच्या पंतप्रधानांकडून अपेक्षा'
पंतप्रधान नरेंद्र नेहमी म्हणतात की "सबका साथ सबका विकास" म्हणून आता एमआयडीसीबाबत आम्ही पंतप्रधानांकडून अपेक्षा ठेवली असून त्यांना पत्र पाठवलं असल्याचं म्हणत रोहित पवार यांनी 'माझा'ला प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान यावेळी बोलतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख मोठं इंजिन असा केला आहे. त्यामुळे जर मोठ्या इंजिनने छोट्या इंजिनला सांगितलं तर काम लगेच होऊ शकतं असं रोहित पवार म्हणाले आहेत.
'पत्राला फोन करुन उत्तर देण्याची विनंती'
'आम्ही एक लाख सह्या करुन पाठवू शकलो असतो, पण पंतप्रधानांचं कार्यलय हे अत्यंत व्यस्त असतं. त्यामुळे आम्ही त्यांना फक्त पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्राला पत्र पोहचलं आम्ही याकडे लक्ष देऊ असं उत्तर न देता थेट एखादा फोन करावा किंवा एखादं पत्र त्यांनी राज्यसरकारला लिहावं', अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच त्यांनी युवकांच्या भविष्यामध्ये राजकारण करुन नये. या संदर्भात पाठपुरवठा झाला असेल तर त्या एमआयडीसीला परवानगी द्यावी अशा आशयाचं पत्र राज्य सरकारला लिहावं असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
मी लोकांच्या वतीने पत्र पाठवलं आहे - रोहित पवार
पवार साहेबांच्या वतीने वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात विनंती करता येऊ शकते पण मी लोकांच्या वतीने पत्र पाठवलं आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत त्यामुळे शरद पवारांच्या माध्यमातून यासाठी केंद्राकडे विनंती का करत नाही या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. तसेच पोस्ट ऑफिस हे लोकांचं असतं त्यामुळे त्यांच्या कामासाठी पोस्टातून पत्र पाठवणं मला योग्य वाटत, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. तसेच या संदर्भात केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी आशा देखील रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांनी कर्जत - जामखेड या त्यांच्या मतदारसंघात एमआयडीसी व्हावी यासाठी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात देखील आग्रही भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी एकट्याने विधानभवन परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन देखील केलं होतं. पण तरीही राज्य सरकारकडून यासंदर्भात कोणताही पाठपुरवठा करण्यात आला नसल्याचा दावा रोहित पवार यांच्याकडून करण्यात येत आहे.