Ahmednagar Crime : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले (Akole) तालुक्यातील दुर्गम भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह काही दिवसांपूर्वी आढळून आल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र मृत महिलेची ओळख पटत नसल्याने तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (Crime Branch) हातात घेतला. मृतदेह सापडलेल्या परिसरात आढळलेल्या सॅनिटरी पॅडवरुन (Sanitary Pad) मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर हत्या करणाऱ्या पतीला आणि त्याच्या भाच्याला अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या डिटेक्शनची जिल्ह्यात चर्चा होत असून त्यांचं कौतुक केलं जात आहे.


तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग


अहमदनगर जिल्ह्यातील राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातळापूर परिसरात 25 वर्षीय महिलेचा मृतदेह (Dead Body) काही दिवसांपूर्वी पोलिसांना आढळला होता. महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश येत नसल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. घटनास्थळी भेट दिल्यानंतर त्याठिकाणी आढळलेल्या पायातील पैंजण, पर्स आणि त्यात असलेल्या सॅनिटरी पॅडवरुन पोलिसांनी हा तपास सुरु केला. या सॅनिटरी पॅडमुळेच पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झालं.


सॅनिटरी पॅडवरुन सुगावा लागला


संबंधित सॅनिटरी पॅडवर फॉर युज ओन्ली जिल्हा परिषद असं लिहिलेलं दिलं. यानंतर हे सॅनिटरी पॅड फक्त ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांसाठी असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी संबंधित मृत महिलेच्या मृतदेहाचा फोटो अंगणवाडी सेविकांना पाठवल्यानंतर महिलेची ओळख पटली. कल्याणी महेश जाधव असं या महिलेचं नाव असून ती राहुरी तालुक्यातील वांबोरी गावातील असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर तपासला वेग आला आणि आम्ही आरोपीपर्यंत पोहोचलो, अशी माहिती अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.


चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून खून


मृत कल्याणी महेश जाधव यांचा खून पतीनेच केल्याचं समोर आलं. चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं. या कामासाठी पती महेश जनार्दन जाधव याला त्याचा भाचा मयूर अशोक साळवे याने मदत केल्याचं स्पष्ट झालं. या दोघांना पोलीस खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. केवळ सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून केलेल्या तपासामुळे गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे.


हेही वाचा


Ahmednagar News : अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर मंदिरात चोरी, चार दानपेट्या फोडून लाखोंची रोकड केली लंपास