Sujay Vikhe Patil : शिर्डी (Shirdi) जवळील निमगाव हद्दीत मोक्काच्या (Mcoca Act) आरोपीने सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या नावे संपर्क कार्यालय उघडले होते. यावरून विरोधकांनी सुजय विखे पाटलांवर निशाणा साधला होता. आता यावर सुजय विखेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या नावाचा गैरवापर होत असेल तर कारवाई करणार, असे त्यांनी म्हटले आहे. 


शिर्डी विधानसभा मतदारसंघात (Shirdi Vidhan Sabha Constituency) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे आमदार असून विखे पाटील यांचे मतदारसंघावर वर्चस्व आहे. महिन्याभरापूर्वी शिर्डी जवळील निमगाव हद्दीत दीपक पोकळे (Deepak Pokale) आणि सागर पगारे (Sagar Pagare) या दोघांनी सुजयपर्व या नावाने संपर्क कार्यालय सुरू केलं. मात्र यातील दीपक पोकळे हा मोक्कातील आरोपी असल्याच आता समोर आले आहे. राहाता मतदार संघातील भाजपचे नेते व विखे पाटील यांचे पक्षांतर्गत विरोधक राजेंद्र पिपाडा (Rajendra Pipada) यांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती समोर आणली. 


सुजयपर्व नावाने सुरु केले होते संपर्क कार्यालय


महिनाभरापूर्वी या कार्यालयाचे उद्घाटन देखील सुजय विखे यांनी केलं होते. या सोहळ्याला मोक्कातील आरोपी दीपक पोकळे हजर नसला तरी त्याचे फोटो असलेले फ्लेक्स परिसरात लागलेले होते. दीपक पोकळे याच्यावर राहता पोलीस ठाण्यात हत्या, गोळीबार आणि लूटमारीचे विविध गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर जेल बाहेर असून जेलमधून सुटल्यानंतर त्याने आपल्या मित्राच्या साथीने सुजयपर्व या नावाने संपर्क कार्यालय सुरू केलं. मात्र या संदर्भात सुजय विखे यांना विचारले असता त्यांनी माझ्या नावाचा जर असा कोणी गैरवापर करत असेल तर त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 


नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील? 


सुजय विखे पाटील म्हणाले की, आमच्या ऑफिसमध्ये अनेक जण येतात. मात्र त्यातील कोण गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे हे आम्हाला माहीत नसतं. कोण कुठल्या जाती-धर्माचा हे सुद्धा आम्ही कधी पाहत नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले कुठलेही लोक आमच्या यंत्रणेत आम्ही कधीही वापरले नाही. यापुढे देखील तसं होणार नाही. आमच्या निदर्शनास अशी बाब आल्यावर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.  


आणखी वाचा 


मोठी बातमी : सुजय विखेंनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला; संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विरूद्ध सुजय विखे लढत?