Ajit Pawar Birthday अहमदनगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे आज अजित पवार यांचा वाढदिवस देखील आहे. अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अहमदनगरमध्ये सध्या शरद पवार गटाचे निलेश लंके खासदार आहेत.
पारनेर तालुक्यातून अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात होत असून कर्जत तालुक्यात दौऱ्याचा समारोप होईल. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात महिलांशी संवाद साधणार आहेत...यावेळी अजित पवार यांच्यासोबत कृषिमंत्री धनंजय मुंडे, महिला बाल विकासमंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडूनही शुभेच्छा-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर अभिष्टचिंतनांचा वर्षाव होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते, समाजाच्या विविध घटकातील मान्यवरांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळीच अजित पवार यांना दूरध्वनी करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनीही अमित शहा यांचे शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीने ट्विट करत दिली. काल अमित शाह यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती आणि आज अजित पवारांना फोन करुन शुभेच्छा दिल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत.
अमित शाह यांची शरद पवारांवर जोरदार टीका-
"भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्यात. आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवं. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल", अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल झालेल्या पुण्यातील भाजपच्या मेळाव्यात केली होती.
अजित पवारांचा दौरा नेहमीपेक्षा वेगळा असणार-
दरम्यान अजित पवारांचा हा दौरा नेहमीपेक्षा वेगळा असून सभा न घेता थेट महिलांशी संवाद साधला जाईल आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नगर दक्षिण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भर राहील अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिली.
"लाडक्या बहिणींचा लाडका दादा"-
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी नागपुरात दादांचा अभिष्टचिंतन करणारे पोस्टर्स लावले आहे. विशेष म्हणजे या पोस्टर्स वर "लाडक्या बहिणींचा लाडका दादा" अशा आशयाने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठीचा श्रेय अजित दादांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणावर महिलांची मतं मिळवून देईल अशी अपेक्षा महायुतीतील पक्षांना आहे.. योजना जरी महायुतीची असली तरी अर्थमंत्री म्हणून त्या योजनेसाठी निधीची तरतूद अजितदादांनी केली असा समज करून त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरभर "लाडक्या बहिणींचा लाडका दादा" अशा आशयाचे पोस्टर्स लावून अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवारांचा शिक्षण संस्थाचालकांना सज्जड दम
आम्हाला फार कठोर व्हायला संस्थांनी लावू नये, काही काही संस्था नाही, मला आत्ताच पैसे पाहिजेत असं म्हणतात. का, सरकारवर विश्वास नाही काय, आणि मग सरकारने सरळच करायचं ठरवलं तर मग संस्था राहिल का, असा सज्जड दमच अजित पवारांनी शिक्षणसंस्था चालकांना दिला. तसेच, माणूस स्वभाव आहे, कुठं ना कुठं चुकतं. आम्ही देखील संस्था चालवतो, पुणे जिल्ह्यातील शिक्षण संस्थेत मी आहे, रयत शिक्षण संस्थेत मी आहे, शारदा प्रतिष्ठानमध्ये मी आहे. अनेक संस्था चालवतो, इथं असलेले अनेकजण संस्था चालवतात. कधीतरी काहीतरी राहतं, पण आपण ते समजून घ्यायचं असतं. त्यामुळेच, आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आपण ही योजना आणली आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले.