अहिल्यानगर : अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) हे मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं चर्चेत आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी यापूर्वी टीकेची झोड उठवली होती. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा येथे अजय महाराज बारस्कर यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अजय महाराज बारस्कर यांनी मद्यधुंद तरुण मनोज जरांगे यांचे समर्थक असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी बारस्कर यांच्या घरातून संबंधित तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
अजय महाराज बारस्कर यांच्या घरी रात्रीच्या वेळी दोन तरुण दाखल झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळतं. ते दोघे येतात त्यावेळी अजय बारस्कर यांची आई तिथं बसलेली असते. त्यानंतर तिथं बारस्कर यांच्या घराशेजारी राहणारा व्यक्ती येतो. हे पाहताच दोन तरुणांपैकी एक जण त्या व्यक्तीला मारहाण करतो. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यासंबंधीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिल्याची माहिती अजय महाराज बारस्कर यांनी दिली आहे.
अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर आरोप
अजय महाराज बारस्कर यांनी यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्यावर विविध आरोप केले होते. या आरोपानंतर जरांगे समर्थकांनी बारस्कर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. घरामध्ये येऊन धिंगाणा घालणारे दोन मद्यधुंद तरुण मनोज जरांगे समर्थक असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. घराच्या बाजूला दुकान आहे, तिथं ऑफिसमध्ये बसलेलो होतो. मला फोन आला आणि घरी पळत गेलो. ते माझ्या घरात घुसले तेव्हा आई घरात बसलेली होती. मी घरी पोहोचलो तेव्हा ते तरुण माझ्या आईला आणि वयस्कर व्यक्तीला मारत असल्याचा दावा अजय महाराज बारस्कर यांनी केला. या प्रकरणाचं सीसीटीव्ही पोलिसांकडे दिल्याचा दावा देखील त्यांनी केला. म्हाताऱ्या माणसांना आणि स्त्रीला मारण्याची संस्कृती आपली आहे का असा सवाल बारस्कर यांनी जरांगे यांना केला.
पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून त्या दोघांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असताना अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे ही शांतता बैठक आहे का, असा सवाल केला. दारु पिऊन माझ्या आईला मारल्याचा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला. घरात जाऊन मारहाण करण्याचा अधिकार कुणाला नाही, असं बारस्कर म्हणाले. दरम्यान, अजय महाराज बारस्कर, त्यांच्या आई आणि शेजारील व्यक्तीला मारहाण केल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
इतर बातम्या :