श्रीरामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत अनेक नेते प्रवेश करत आहेत. यावर शरद पवार यांनी राज्यात मागच्या दोन महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील 80 टक्के लोक हे भाजपमधून (BJP) आहेत, असे वक्तव्य केले. तर महाराष्ट्रातील सत्ता यांच्या हातून काढून घ्यावी लागेल, असेही शरद पवार म्हणाले. आता यावरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांवर जोरदार पलटवार केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ज्यांची संपूर्ण हयात फोडाफोडीत गेली. त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक गोष्ट ते त्याच नजरेने पाहतात. मात्र त्यांचा गैरसमज लवकरच दूर होईल. उद्याच्या विधानसभेत मोठे इनकमिंग भाजपात होईल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून येतीलच मात्र शरद पवारांकडे किती शिल्लक राहतील हा प्रश्न आहे, असा पलटवार त्यांनी केला आहे.
निम्मा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत
ते पुढे म्हणाले की, तुम्हाला चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळालं. तुम्ही काय परिवर्तन केलं. निम्मा बारामती तालुका आजही दुष्काळाच्या छायेत आहे. निळवंडे धरणाचे चार वेळा भूमिपूजन केले. समन्यायी पाणी वाटपाचे भूत देखील यांच्याच काळात राज्यावर आलं. पवारांच्या दबावाखालीच थोरात यांनी त्यावेळी यावर सह्या केल्या. येणाऱ्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणीच होणार, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली.
कोण बनेगा मुख्यमंत्री, असं नाना पटोलेंचं सुरु
प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या जिल्ह्यातील पोरगा मोठा होत असेल तर त्याला आशीर्वाद द्यावा, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत त्यांच्या मनातील मुख्यमंत्री पदाबाबत इच्छा व्यक्त केली. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचं त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहील. तुम्ही सत्तेत येणार नाही तर तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची काळजी करण्याचं कारण नाही. कोण बनेगा मुख्यमंत्री असंच काम सध्या त्यांचे सुरू आहे, असा टोला त्यांनी यावेळी नाना पटोले यांना लगावला.
फडणवीसांचा राजीनामा मागून घटनेचं राजकारण करू नका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारले असता ते म्हणाले की, बाबा सिद्दिकी यांची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. ते एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. गेल्या आठवड्यातच ते मला भेटले होते. अशा घटनांमध्ये मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचले गेले पाहिजे. फडणवीसांचा राजीनामा मागून या घटनेचं राजकारण करू नका हीच इच्छा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा