Ahmednagar News अहमदनगर : राहुरीत वकील दाम्पत्याच्या खुनाचा निषेध करण्यासाठी आणि वकिलांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा बार असोसिएशन तसेच तालुक्यातील सर्व बार असोसिएशनने जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद करून वकिलांना बाहेरच रोखल्याने वकील संतप्त झाल्याचे दिसून आले.


मागील दहा ते अकरा दिवसांपासून राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील वकिलांचे काम बंद आंदोलन सुरू होते. वकील संरक्षण कायदा व्हावा, आढाव वकील दाम्पत्याचे प्रकरण उज्वल निकम यांच्याकडे द्यावे, या प्रमुख मागणीसाठी आज वकिलांनी मोर्चा काढला होता. 


वकिलांनी पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या


दरम्यान अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आला असता पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद केले. त्यामुळे पोलीस आणि वकिलांमध्ये काही काळ बाचाबाची देखील झाली. काही पुरुष व महिला वकील चक्क गेटवर चढून पलीकडे उतरण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. तसेच यावेळी वकिलांकडून पाण्याच्या बाटल्या देखील फेकण्यात आल्या. या मोर्चामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सहभागी होते. 


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर गोंधळाचे वातावरण


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. वकील जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी आक्रमक झाले होते. काहींनी गेटच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या, महिला वकिलांसह अनेकजण गेटवर चढले. यामुळे पोलिसांनी वकिलांसाठी गेट उघडले नाही. 


वकील संघटना पुन्हा काम सुरू करणार


यानंतर प्रत्येक तालुक्यातील वकील संघटनांच्या निवडक पदाधिकार्‍यांना प्रवेश दिला व त्यांनी आ. जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेतली. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यावर वातावरण शांत झाले. आमदार सत्यजित तांबे यांनीही नंतर मोर्चेकरी वकिलांची भेट घेतली. सोमवारपासून वकील संघटना पुन्हा आपले काम सुरू करणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा बारा असोसिएशनचे अध्यक्ष नरेश गुगळे यांनी दिले आहे.


वकील दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जण ताब्यात


राहुरीतील मानोरी गावातील वकील राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांचा पंधरा दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला. आढाव दाम्पत्याचे पक्षकार असलेली व्यक्तीच या गुन्ह्याची सूत्रधार असल्याचे आढळले. खुनाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) यापूर्वीच वर्ग करण्यात आला आहे. तत्पूर्वीच स्थानिक पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मात्र वकील संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी जिल्हाभरातील वकिलांनी आंदोलन पुकारले होते. आज जिल्ह्यातील वकिलांनी मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते.


आणखी वाचा 


Balasaheb Thorat : "सत्ताधारीच गुन्हेगार झालेत, न्याय कोणाला मागायचा?" बाळासाहेब थोरात कडाडले