Balasaheb Thorat अहमदनगर : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरलंय. राज्य सरकारचा गुन्हेगारांवरचा धाक संपल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर सत्ताधारीच गुन्हेगार झाले आहे. त्यामुळे न्याय कोणाला मागायचा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


मुंबईतील गोळीबार आणि राहुरी येथील वकील दाम्पत्य हत्येवरून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का? अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. भाजपचा (BJP) आमदार गोळीबार करतो आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो, याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे, असा समाचार बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे. 


काँग्रेस पुन्हा उभी राहील 


काँग्रेस (Congress) पक्षाला अनेकजण सोडून जात आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांना विचारला असता ते म्हणाले की, काँग्रेसचा कठीण काळ सुरू आहे. हे मी मान्य करतो पण, 1980 साली सुद्धा काँग्रेसची अशी अवस्था होती. काँग्रेस कुठे आहे हे विचारलं जातं होतं. इंदिराजींसोबत फिरण्यासाठी माणसे नव्हती. 1999 साली काँग्रेसचे किती उमेदवार येईल हे विचारले जातं होते. मात्र मोठ्या झाडाच्या फांद्या शेतकरी छाटतो आणि त्याला नव्या पालवी फुटतात. त्यामुळे कोणी गेला म्हणून काहीही थांबत नाही. काँग्रेस पुन्हा उभी राहील, असे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.


जनता दूधखुळी नाही


निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयानंतर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. कुणी पक्ष बदलला तर असं सांगत नाही की स्वतःच्या हितासाठी पक्ष बदलला हा माझा राजकीय हेतू होता, ते सगळे जनतेचेच हित सांगत असतात पण जनता सुद्धा दूधखुळी नाही, एखाद्या पारावरच्या इसमाला विचारलं की, खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची, तो जे उत्तर देईल तो खरा न्याय, असे त्यांनी यावेळी म्हटले. 


ईव्हीएममध्ये घोटाळा करता येऊ शकतो, यावर विश्वास बसला


भाजप निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करू शकतं, ईव्हीएममध्ये घोटाळा देखील करू शकतात यावर आपला विश्वास बसत नव्हता. मात्र, चंदिगड येथे झालेल्या महापौर निवडणुकीमध्ये ईव्हीएमबाबत छेडछाड झाली. सुप्रीम कोर्टाने देखील यावर ताशेरे ओढले आहेत. यावरून निश्चितच ईव्हीएममध्ये घोटाळा करता येऊ शकतो, यावर आपला विश्वास बसला असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.


लोकसभा निवडणुकीत काँग्रेस शिर्डीच्या जागेसाठी आग्रही


लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) काँग्रेस पक्ष हा अहमदनगर दक्षिण मतदारसंघासाठी नव्हे तर शिर्डीच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. आमची चर्चा सुरु आहे.ते म्हणतात आमच्याकडे उमेदवार आहे. आम्ही म्हणतो आमच्याकडे उमेदवार आहे. मात्र, शेवटी जो निर्णय होईल त्या पद्धतीने आघाडीचे नेते आणि पदाधिकारी काम करतील, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. 


वाळू तस्करीला संरक्षण मिळतंय


महसूल विभागाकडून नागरिकांना 600 रुपयात एक ब्रास वाळू देण्याचे धोरण फसलं असून या धोरणामुळे राज्य सरकारचा 2 हजार 200 कोटींचा महसूल बुडाला असल्याचं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना 600 रुपयांमध्ये एक ब्रास वाळू घरपोच मिळणार असल्याची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात सामान्य नागरिकाला वाळू मिळाली नाही. उलट वाळू चोरीच्या घटना वाढल्या असून त्याला आळा घालण्यापेक्षा वाळू तस्करीला संरक्षण मिळत असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. मी महसूल मंत्री असताना वाळूतून 2 हजार 200 कोटीचा महसूल सरकारला मिळायचा. आता वाळू करण्यासाठी महसूल विभाग पैसे खर्च करत असल्याचे देखील थोरात यांनी म्हटलं आहे.


तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी करा 


तलाठी भरतीमध्ये मोठा घोटाळा झाला असून या भरती प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी वाळू माफिया देखील सहभागी असल्याचा खळबळ जनक आरोप माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. या भरती प्रक्रियेत प्रामाणिक अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी, असे देखील थोरात म्हणाले आहेत. 


आणखी वाचा 


पत्नी-मुलगी धाय मोकलून रडल्या, अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी