Jayant Patil : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात दिवसाढवळ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेला 20 दिवस उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरु केले होते. तिसऱ्या दिवशी पोलिस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले त्यामुळं त्यांनी तूर्तास उपोषण मागे घेतले आहे. मात्र, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील 

अलीकडच्या काळात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडत आहेत. मूलभूत प्रश्न बाजूला सारण्यासाठी जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का? अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. समाजात अस्थिरता निर्माण करुन आपण विकासाचे नक्की कोणते पाऊल उचलू पाहत आहोत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देशभर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांचा अपमान करणाऱ्यांना मोकाट सोडायचे हा या सरकारचा दुटप्पीपणा आहे. गृहमंत्रालयाने अशा सर्व घटनांचा त्वरित छडा लावण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला द्यावे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. 

प्राजक्त तनपुरे यांनी सुरु केलेला लढा अधिक बळकट व्हावा यासाठी पक्ष त्यांच्या पाठीशी

छत्रपती शिवरायांचा विचार चिरकाल टिकावा, त्यांच्या आदर्शाचे संस्कार पुढील पिढीवर व्हावे आणि समाजात एकोपा नांदावा यासाठी प्राजक्त तनपुरे यांनी सुरु केलेला लढा अधिक बळकट व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे जयंत पाटील म्हणाले. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात 26 मार्चला दिवसाढवळ्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. घटनेला 20 दिवस उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. तिसऱ्या दिवशी तनपुरे यांची प्रकृती खालावली आणि वजनही कमी झाल्याने उपोषणस्थळी सलाईन सुरू करण्यात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून हे उपोषण स्थगित केले होते.

महत्वाच्या बातम्या:

Jayant Patil And Gopichand Padalkar: दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठं होत नाही...; जयंत पाटील यांचा निशाणा, गोपीचंद पडळकरांचंही प्रत्यु्त्तर