Heramb Kulkarni : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर हल्ला करून फरार झालेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिघांना सोमवारी रात्री पकडलं होतं, त्यात अक्षय सब्बन, चैतन्य सुडके आणि एक अल्पवयीन मुलगा यांचा समावेश होता. या गुन्ह्यात सहभागी असलेले दोघे पसार झाले होते. पोलिसांनी फरार आरोपींचा पिच्चा पुरवला आणि आता त्यांनाही तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सनी जगधने, अक्षय माळी अशी त्यांची नावं आहेत. दरम्यान, सुपारी घेऊन हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं होतं. पण याबाबत बोलताना पोलिसांनी घुमजाव करत, यासंदर्भात पोलीस तपास सुरू असल्याचं म्हंटलं आहे.
हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणात पानटपरी चालकाचा समावेश असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर हल्ला करण्यासाठी 15 हजार रुपयांची सुपारी देखील देण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. अतिक्रमणात (Encroachment) असलेली पानटपरी काढून टाकण्यासाठी कुलकर्णी यांनी महानगरपालिकेत अर्ज केला होता. त्यानुसार महापालिकेनं कारवाई देखील केली होती. त्याचा राग मनात धरून संशयित अक्षय सब्बन यानं त्याच्या पाच साथीदारांच्या मदतीनं कुलकर्णी यांच्यावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे.
हेरंब कुलकर्णी यांच्याकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
हल्ला करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मात्र तो मुलगा खरंच अल्पवयीन आहे का? याची देखील चौकशी करणं गरजेचं आहे, असा सवाल हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. जर तो मुलगा अल्पवयीन असेल तर त्याच्याकडे दुचाकी आलीच कशी? संबंधित अल्पवयीन मुलाला बालसुधार गृहामध्ये का पाठवण्यात आलेलं नाही? असा सवालही हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे.
नेमकं घडलंय काय?
संशयित अक्षय सब्बन याची सिताराम सारडा शाळेजवळ पान टपरी होती. या टपरीला मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी हरकत घेतली. त्यांच्या तक्रारीवरून महापालिकेनं टपरी हटवली होती. त्याचा राग मनात धरून संशयित अक्षय सब्बन यानं त्याच्या पाच साथीदारांच्या मदतीनं कुलकर्णी यांच्यावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पोलिसांचा सब्बन याच्यावर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मात्र, तो माहिती देत नव्हता. सीसीटीव्हीत हल्लेखोरांचे दुचाकीवर फोटो मिळाले होते. या फुटेजमधील एका आरोपीसारखा दिसणारा मुलगा शहरातील कोंड्या मामा चौकात राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर इतर संशयितांची नावं पुढे आली. आता याप्रकरणातील पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Heramb Kulkarni : एका जीवाची किंमत फक्त 15 हजार? सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा सवाल