Agriculture News : मागील तीन ते चार दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, या सततच्या पावसामुळं पारनेर (Parner) तालुक्यातील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. खडकवाडी परिसरात तर शेती पिकांसोबतच शेतजमीन देखील वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच या जोरदार पावसामुळे टोमॅटो, कोबी, झेंडूचे मोठं नुकसान झालं आहे. अद्यापही शासनाकडून या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं शेती पिकांना फटका बसला आहे. सततच्या पावसामुळं पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही या पावासाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मात्र, अद्यापबी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले नाहीत. त्यामुळं नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करुन, मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदतीची मागणी
जून, जुलै आणि ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळं राज्यात शेती पिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल सांगितले होते. त्याप्रमाणं मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून 3 हजार 501 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली असून मदत आणि पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात परतीच्या पावसानं शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने सध्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
आजही राज्यात पावसाचा अंदाज
हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात रात्री पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं. पावसामुळं सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरु होती. तसेच पुणे, सोलापूर या जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज कोकणात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रात देखील पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: