अहमदनगर : जिल्ह्यातील निर्मळ पिंप्री गावात जमावाने दोन कुटूंबावर जिवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यामागे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची (Gram Panchayat Election) पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. संतप्त झालेल्या 400 ते 500 लोकांच्या जमावाने घराची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात 71 जणांविरोधात अॅट्रोसीटीसह मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आरोपींमध्ये 20 ते 25  जण अनुसूचित जातीचे देखील आहेत.


या हल्ल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने रात्रीपासून लोणी पोलीस स्टेशनचा आसरा घेतला असून, लहान मुलाबाळांसह सर्वजण घाबरले आहेत. गावात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण  शांतता आहे. विशेष म्हणजे हल्ला करणाऱ्या जमावाकडून 'यांचं मणिपूर करा' असे सांगण्यात येत असल्याचा आरोप पिडीत कुटुंबाच्या वतीने करण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण? 


या प्रकरणी 45 वर्षीय महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी गावातील लोकांसोबत त्यांचा मुलाचे वाद झाले होते. मात्र, पुढे वाद गावकऱ्यांच्या पुढाकाराने मिटले होते. या प्रकरणी पोलिसांत देखील नोंद झालेली आहे. दरम्यान, बुधवारी अचानक गावातील मोठा जमाव या महिलेच्या घरी येऊन धडकले. यात काही महिलांचा देखील समावेश होता. याच जमावातील काही लोकांनी घरात घुसुन टीव्ही उचलुन बाहेर फेकला. घरातील तीन गव्हाचे पोते बाहेर फेकले. तेंव्हा समोरील गर्दी पाहुन व गर्दीचा आवाज ऐकुन महिलेसह घरातील लोकांनी घराचा दरवाजा लावून घेतला. मात्र, त्यानंतर जमलेल्या लोकांनी दरवाजावर लाथा मारुन घरावर दगडफेक केली. तसेच, घराच्या पाठीमागील शेळयाचे पत्र्याचे शेडनेट पेटवून देण्यात आले. दरम्यान, काही वेळात पोलीस पोहचले आणि त्यांनी जमावाला पांगवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 


लहान मुलांना मारहाण केल्याचा आरोप...


यावेळी आलेल्या जमावाने महिलेच्या घरासमोरील पाण्याची टाकी फोडलेली, तसेच घरासमोर असलेल्या गादया पलंग फेकुन दिले. तसेच घरासमोरील असलेले शेड पाडले. घराच्या पत्र्यावर आणि घरावर दगडफेक केली. तसेच फिर्यादी महिलेच्या पुतण्याची घरासमोरील टाटा मॅजीक गाडी पलटी करुन तिचे देखील नुकसान केले आहे. सोबतच यावेळी घरातील लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 71 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पिडीत कुटंब प्रचंड घाबरून गेले असून, त्यांनी गाव सोडत पोलीस ठाण्याचा आसरा घेतला आहे. तसेच, पोलिसांकडून देखील गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nagpur Crime News : गॅस एजन्सीच्या कॅशिअरवर हल्ला, साडेबारा लाखांची रोकड लुटली; नागपूरमधील घटनेने खळबळ