शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrishna Vikhe Patil) यांच्या मतदारसंघातील गणेश कारखाना निवडणुकीत भाजपच्या (BJP) विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Congress Balasaheb Thorat) यांच्याशी युती करत विखेंचा कारखाना निवडणुकीत पराभव केला. मात्र आता राधाकृष्ण विखे यांनी आपला मोर्चा कोपरगाव मतदारसंघात वळवला असून कोल्हेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या समवेत विविध विकास कामांचे भूमिपूजन करत भाजपच्या कोल्हे विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हे काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघ म्हटलं की, काळे विरुद्ध कोल्हे ही पारंपारिक लढत नेहमीच चुरशीची ठरते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे विवेक कोल्हे हे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर हात मिळवणी करत विखेंना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. विखे यांच्या मतदारसंघातील गणेश कारखाना निवडणूक असेल किंवा राहता तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका यामध्ये विखेंचा पराभव करण्यासाठी विवेक कोल्हे यांनी काँग्रेसच्या थोरात यांना बरोबर घेत कंबर कसल्याच दिसून आलं. मात्र आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगाव मतदारसंघात लक्ष घातले असून राष्ट्रवादीचे आमदार अशितोष काळे यांना बरोबर घेत त्यांनी आज कोपरगाव तालुक्याचा दौरा केला.
राधाकृष्ण विखे पाटलांची नाव न घेता कोल्हेंवर टीका
मंगळवारी सकाळी नियोजित दौरा खराब हवामानामुळे उशिरा सुरू झाला. कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्याची सुरुवात पालकमंत्री विखे यांनी आपल्या सासरवाडीतून केली. संवत्सर गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण यावेळी करण्यात आलं. यावेळी झालेल्या नागरिक सत्कार सोहळ्याच्या मंचावर राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यासह राजेश परजणे हे उपस्थित होते. हे सर्वजण कोल्हे यांचे विरोधक समजले जातात. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या भाषणातून आशुतोष काळे यांची स्तुती करताना कोल्हे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपच्या कोल्हे आणि विखे या दोन नेत्यांमध्ये मतभेद
राष्ट्रवादी अजित पवार गटाने शरद पवार यांचा फोटो वापरू नये असा सल्ला खुद्द शरद पवारांनी दिला होता. मात्र आज कोपरगाव तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजनाचे फ्लेक्स राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी लावले होते. विशेष म्हणजे या फ्लेक्स वर शरद पवारांचाही फोटो होता. एकूणच भाजपच्या कोल्हे आणि विखे या दोन नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीपासूनच मतभेद होते. आगामी काळात याचा फटका भाजपाला बसणार की त्याचा फायदा राष्ट्रवादी अजित पवार गट उचलणार हे आगामी काळात स्पष्ट होईल..