अहिल्यानगर : अमोल खताळ हा सर्वसामान्य कार्यकर्ता, तुम्ही त्याला आमदार बनवलं. तो संधीचं सोनं करणारा असून त्याने 40 वर्षांची मक्तेदारी उथलथवली असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरवासियांचे आभार मानले. अमोल खताळ हा जायंट किलर नसून त्याला निवडून देणारे तुम्ही मतदार जायंट किलर आहात असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करुन शिवसेनेचे अमोल खताळ हे निवडून आले. त्यानिमित्त मतदारांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे हे संगमनेरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

संगमनेरचे मतदार जायंट किलर

एकनाथ शिंदे म्हणाले की, "हेलिकॉप्टरमधून तुमच्या पर्यंत यायला तीन तास लागले. इथे संगमनेरला समुद्र नाही, पण समोर जनसागर लोटला आहे. भगवं वादळ आज इथे दिसत आहे. इथे सगळे स्वयंस्फूर्तीने आले आहेत, कोणाला भाड्याने आणलेल नाही. अमोल खताळ हा जायंट किलर ठरला, मात्र इथल्या मतदारांनी जो चमत्कार घडवला त्यामुळे खरे जायंट किलर तुम्ही मतदार आहात. विधानसभा निवडणुकीत तुम्ही चमत्कार घडवला आणि 40 वर्षांची मक्तेदारी उलथवून टाकली. त्यामुळेच मी तुमचं दर्शन घ्यायला इथे आलो आहे, तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला आलो आहे."

जे खबऱ्या, खेळणं म्हणत होते, त्यांच्या हातात आता आपण खुळखुळा दिलाय खेळण्यासाठी. अमोल काम करत राहील, तुम्ही खेळत रहा. खबर देण्याचं काम अमोल खताळ करेल. काम नसल्यावर तुम्ही खबरबात घेत रहा असा टोला एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब थोरात यांना लगावला.

संधी करणारा आमदार

अमोल खताळ संगमनेरचा मात्र दिल्लीत देखील माहीत झाला आहे. अमोलला संजय गांधी योजनेचे पद मिळालं आणि त्याने निराधारांना आधार दिला. म्हणून संधीच सोनं करणारा आमदार कोण तर अमोल खताळ अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं.

यांनी काय-काय चोरलं?

बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "संगमनेरमध्ये साखर कारखाना, दूध संघ, सगळ्या संस्था त्यांच्याच. दूध पण माझा, चहा पण माझा, बिस्कीट पण माझं, मग जनतेचा काय? म्हणून तुम्ही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून दिलं. 440 चा झटका विरोधकांना दिला, तरी ते त्यातून बाहेर येत नाही. अजूनही व्होट चोरी झाली म्हणतात. मात्र गेल्या 50-60 वर्षात यांनी काय काय चोरलं, कितीतरी भ्रष्टाचार यांनी केले. 2014 पूर्वी तर भ्रष्टाचाराची रांगच होती. त्यांचा मेंदू आणि स्वाभिमान, अभिमान देखील चोरीला गेला आहे."

जेव्हा लोकसभा जिंकले, त्यावेळेस ईव्हीएम, निवडणूक आयोग चांगला, निवडणूक हरल्यावर मत चोरीचे आरोप सुरू केले. आरोपाचे राजकारण विरोधक करत आहेत. त्यामुळे आरोपाला आरोपाने नव्हे तर कामातून उत्तर देणार असं एकनाथ शिंदे म्हणाले.

लाडक्या बहिणींमुळे महायुतीला यश

एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकारच्या लोकांना अजून सरकार गेलं हेच वाटत नाही. लोकसभेत फेक नेरेटिव्ह पसरून त्यांना यश मिळालं. त्यामुळे त्यांना वाटलं विधानसभेत सरकार येईल. मात्र माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या हॉटेलची बुकिंग रद्द करून त्यांना घरी पाठवलं."

एकनाथ शिंदे म्हणाले की, "लाडकी बहीण योजनेत निवडणुकीच्या वेळी काही लोक कोर्टात गेले. काही लोकांनी ही योजना फसवी आहे असं सांगितलं. पण लाडक्या बहिणीने लाडक्या भावाचं ऐकलं. माझ्या लाडक्या बहिणीने दोन-पाच नंबरचा नव्हे तर 232 नंबरचा जोडा विरोधकांना हाणला. एवढं मोठं यश महायुतीला कधीच मिळाल नाही. हा पराक्रम तुम्ही सर्वांनी केला."

लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हप्ते मागेपुढे झाले असतील, पण बंद होणार नाही. जे जे आश्वासन आम्ही दिले ती टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार. आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेकच नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.