अहमदनगर : दिवाळी फराळाचे (Diwali 2023) आयोजन करून कुणीही आमदार-खासदार होत नाही, असा सनसनीत टोला अहमदनगरचे खासदार सुजय विखे (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी राम शिंदे आणि निलेश लंके यांना लगावला. सुजय विखे यांच्या या वक्तव्याची अहमदनगरमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. निलेश लंके आणि राम शिंदे यांनी एकमेकांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला हजेरी लावली होती, त्यावरुन सुजय विखेंनी निशाणा साधला. आता निलेश लंके यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं औत्सुक्याचे आहे.


राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी एकमेकांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला हजेरी लावल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. हे दोन्ही नेते भाजप खासदार सुजय विखेंचे कट्टर विरोधक मानले जातात, सोबतच दोघेही भविष्यात लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. मात्र त्यांनी आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमावरून खासदार सुजय विखेंनी दोघांनाही चांगलाच टोला लगावला आहे. असे फराळाचे कार्यक्रम ठेऊन कुणी आमदार खासदार होत नाही, तसं असतं तर प्रत्येक तालुक्यातील हलवाई आमदार खासदार झाला असता, असा टोला त्यांनी लगावला.त्यासोबतचगेली पन्नास वर्षे विखे कुटुंबीयांनी योगदान दिले आहे, तेव्हा कुठे  जनमाणसांमध्ये आम्ही आलो आहोत. दहा दिवसांच्या फराळाने कुणीही हुरळून जाऊ नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिलाय..






अंध विद्यार्थ्यांसाठी स्कूल व्हॅन भेट -
अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त अनामप्रेम संस्थेच्या अंध विद्यार्थ्यांसाठी स्कूल व्हॅन भेट देऊन माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.अहमदनगर शहरातील अनामप्रेम या संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी अडचण व्हायची. मात्र त्यांची अडचण दूर होण्यासाठी धनंजय जाधव यांनी त्यांना सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्कूल बस भेटली आहे.याचं लोकार्पण सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी या दिव्यांग विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर अनेक दिवसापासून मी ह्या विद्यार्थ्यांची अडचण पाहत होतो. त्यामुळे वाढदिवसानिमित्त साधून आज स्कूल बस त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे.