अहमदनगर (Ahmednagar) : धनगर आरक्षण (Dhangar Reservation) अंमलबजावणीच्या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडी (Chondi) इथे सुरु असलेल्या उपोषणाचा आजचा 21 वा दिवस आहे. चौंडी इथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरु आहे. उपोषणकर्ते सुरेश बंडगर (Suresh Bandgar) आणि अण्णासाहेब रुपनवर (Annasaheb Rupanvar) यांची तब्येत खालावली आहे. दरम्यान काल (25 सप्टेंबर) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आंदोलकांशी फोनवरुन चर्चा करत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. आज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी चौंडीत येणार आहेत. 


मुख्यमंत्र्यांचा उपोषणकर्त्यांना फोन


चौंडी इथल्या उपोषणकर्त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिली. तसंच सरकार धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक असून उपोषण सोडावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्याचं दोडतले यांनी सांगितलं. सोबतच सरकारच्या वतीने आज मंत्री गिरीश महाजन चौंडीत आंदोलकांशी चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्याचंही दोडतले यांनी म्हटलं. मात्र, आज मार्ग निघाला नाही आणि ठोस निर्णय घेतला नाही तर आम्ही उपोषणावर ठाम आहोत. आम्ही आश्वासनावर उपोषण सोडणार नाही, ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरुच ठेवू, असा निर्धार दोडतले यांनी व्यक्त केला.


भाजप आमदार उपोषणस्थळी


दरम्यान, भाजपचे आमदार राम शिंदे यांनी काल चौंडीमधील आंदोलनस्थळी भेट दिली. या आंदोलनाबाबत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचे राम शिंदे यांनी म्हटलं. याशिवाय भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी देखील चौंडीतील उपोषणकर्त्यांची भेट घेत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. आमचे उपोषण हे धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी आहे, धनगर आरक्षण मागणीसाठी नाही असं उपोषणकर्त्यांनी आमदार कुचे यांना सांगितलं. उपोषणकर्त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या जातील असं कुचे यांनी म्हटलं. सोबतच आंदोलकांनी तब्येत सांभाळून आंदोलन करावं, सरकार सकारात्मक आहे केवळ मिळालेल्या आंदोलनाला न्यायालयात कुणी आव्हान देऊ नये या पद्धतीने आरक्षण देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करेल असं म्हणत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. तर चार दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवल्या जातील असं आश्वासन दिलं.


हेही वाचा


Ahmednagar News : 'पप्पांना काही झालं तर धनगरांशी गाठ', उपोषणकर्ते सुरेश बंडगरांच्या मुलीचा सरकारला इशारा