शिर्डी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची खळबळजनक घटना घडली. मंत्रालयात सुरक्षाव्यवस्था असतानाही महिला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयापर्यंत कशी पोहोचली? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून आता यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना आजची घटना नाही. ही कालची घटना आहे. त्या महिलेचे काय म्हणणं होते तिने कशा करता हे केले ते आम्ही निश्चितपणे समजून घेऊ. एखाद्या उद्विग्नतेने तीने हे केले आहे का? तिची काय व्यथा आहे? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ आणि ती व्यथा दूर करण्यास आम्ही प्रयत्न करू. महिलेला कुणी पाठवले याची माहिती घेणार आहे, असे त्यांनी म्हटले.
कोणी जाणीवपूर्वक पाठवले असेल तरी...
या प्रकरणावरून लाडक्या बहिणीचा राग अनावर झाला, अशी टीका विरोधक करत आहे. यावर विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधक इतके हताश झालेत की त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत. मला जर टीका करायची असेल तर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. पण कोणी खालच्या स्तरावर उतरले म्हणून माझ्या सारख्यांनी खालच्या स्तरावर थोडी उतरायचं असतं. एखाद्या बहीण चिडली असेल तर तिची काही व्यथा असेल तर आपण समजून घेऊ. कोणी जाणीवपूर्वक पाठवले असेल तरी देखील महिलेची बाजू समजून घेऊ, असे प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
विकसित महाराष्ट्र करायचा असेल तर...
लाडकी बहीण योजनेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेला आमच्या बहिणी प्रतिसाद देतात त्यावेळेस आम्हाला खूप आनंद होतो. खरं म्हणजे आम्हाला अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. जितक्या जास्त गोष्टी आम्ही करू शकतो तितका आमचा जास्त प्रयत्न असणार आहे. कारण विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र करायचा असेल तर आपल्याला महिलांचा विकास सर्वात महत्त्वाचा आहे. याला काही कालावधी निश्चितपणे लागेल. परंतु, राज्य सरकारने त्या दिशेने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.
दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न म्हणजे जनतेशी द्रोह
लाडकी बहीण योजनेवर विरोधक टीका करत आहे याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला त्यांची टीका ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटते. राजकारणात एकाने विकासाची रेषा उमटवली तर त्यापेक्षा मोठी रेषा उमटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न हा एक प्रकारे जनतेशी द्रोह आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, रोज न्यायालयात जाणे, ही योजना कशी थांबवता येईल याचे प्रयत्न करणे, आम्ही निवडून आलो तर योजना थांबवून टाकू, या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद केल्या पाहिजेत, असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.
आणखी वाचा