Ahmednagar latest News : अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे स्मशानभूमीतून चक्क राख चोरीला जातेय... अंत्यविधीनंतर उरणारी राख अगदी अस्थीसह गायब होत असल्यानं ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय. करंजी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर गावातील उत्तरेश्वराच्या मंदिराजवळ असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधी होतो. मात्र, अत्यंविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत व्यक्तीचे नातेवाईक अस्थी घेण्यासाठी गेल्यानंतर राखेसह अस्थी चोरल्या जात आहेत. आतापर्यंत चार वेळा असे प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. मागील सोमवारी करंजी गावातील लिलाबाई वामन यांचे दुःखत निधन झाले. त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. मात्र दुसऱ्या दिवशी जेंव्हा त्यांचे नातेवाईक अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले तर त्यांच्या अस्थी गायब होत्या असं त्यांचा मुलगा रमेश वामन यांनी सांगितले.विशेष म्हणजे केवळ महिलांची राख चोरीला जात असल्याने मृत व्यक्तींच्या अंगावरील सोन्याच्या हव्यासापोटी हे प्रकार घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते.
अंत्यविधीवेळी लिलाबाई यांच्या अंगावर सुमारे पाऊने दोन तोळे सोने होते. लिलाबाई यांना नथ घालण्याची हौश होती. अत्यंविधीच्यावेळी मुलांनी नवी नथ आईला घातली होती. या सोन्यासाठी चोराने थेट राखेसह अस्थी देखील चोरून घेऊन गेला. मृत व्यक्तीच्या अंगावरील डाग दागिने गेले याचे दुःख वाटत नाही मात्र,राखेसह थेट अस्थीच चोरून नेल्या जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. मृत व्यक्तींच्या अस्थी या दशक्रिया विधीसाठी लागत असतात मात्र सोन्यासाठी थेट अस्थीच चोरल्या जात असल्याने मृत व्यक्तींच्या नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे गावातील सुभाष अकोलकर यांनी म्हटले आहे.
लिलाबाई यांच्या आधीही करंजी गावात असे प्रकार तीन वेळा झाले आहेत. विशेष याआधी कोरोनामुळे निधन झालेल्या महिलेची राख चोरट्यांनी चोरून नेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान वारंवार अशा घटना घडत असल्याने ग्रामपंचायतमध्ये यावर चर्चा करून स्मशानभूमीत सीसीटीव्ही बसवणार असल्याचे गावचे उपसरपंच भाऊसाहेब क्षेत्रे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. अशा स्मशानभूमीतून राख चोरीला जात असल्याने पोलिसांकडे तरी तक्रार कशी करावी असा प्रश्न ग्रामस्थांपुढे पडला आहे.
उत्तरेश्वराच्या मंदिर परिसरात सध्या सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र, चोरटे स्मशानभूमीच्या मागच्या गेटने आत येतात.बाजूलाच नदी असल्याने तिथून पाणी घेऊन अंत्यविधीची राख विझवतात आणि राख अस्थींसह भरून घेऊन जातात असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.आता मृत व्यक्तीच्या अस्थींच्या सुरक्षेसाठी रखवालदार किंवा सीसीटीव्ही लावण्याची वेळ येणार असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.