Amol Kolhe अहमदनगर : येथील पिंपळगाव माळवी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ शुकृवारी खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खा. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा (NCP Ajit Pawar Group) अजित पवार मित्र मंडळ असा उल्लेख केला आहे. तसेच खा. सुजय विखेंवर (Sujay Vikhe-Patil) देखील अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्राचे 48 खासदार आहेत, त्यापैकी उद्धव ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नऊ खासदार आहेत. बाकीचे भाजपचे, शिंदे गटाचे आणि अजित पवार मित्र मंडळाचे 39 खासदार आहेत. हे 39 खासदार कांदा निर्यात बंदीवर का बोलले नाही? असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारला. अद्याप निवडणूक आयोगाचा (Election Commission) निकाल लागलेला नाही त्यामुळे पक्षाचे नाव घेता येणार नाही. त्यांना मित्रमंडळच म्हणावे लागेल, असा टोला त्यांनी अजित पवार गटाला लगावला आहे.
सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल
अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांचे मंदिर होतंय म्हणून तुमच्या भागातील लोकप्रतिनिधी साखर वाटत आहेत. मात्र ते ज्या वेळेला साखर वाटायला येतात तेव्हा त्यांना आधी हा प्रश्न विचारा की , केवळ साखर देऊन आमची तोंड बंद करण्यापेक्षा जेव्हा कांद्याची निर्यात बंदी सरकारने लादली तेव्हा तुमचं तोंड संसदेत का उघडलं नाही? असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
त्यांनी करोडोंची साखर वाटली का?
एकीकडे मागच्या आठ ते दहा महिन्यांमध्ये दुधाचे दर पाडून त्यांनी शेतकऱ्यांच्या खिशातून करोडो रुपये काढून घेतले. आता काय त्यांनी करोडोंची साखर वाटली का? असा सवाल करत खा. अमोल कोल्हे यांनी हिशोब मांडत खा. सुजय विखेंना चिमटा काढला आहे.
अशा लोकांना श्रीराम कसे पावतील?
दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी गुरुवारी शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात त्यांनी अजित पवार आणि भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “प्रभू श्रीराम हे आमचे दैवत आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. प्रभू श्रीरामांनी वडिलांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी वनवास पत्करला होता. आज मात्र पितृतुल्य गुरुंना वनवासात जाण्याचा, निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा लोकांना श्रीराम कसे पावतील? जनता सूज्ञ आहे, असा हल्लाबोल त्यांनी अजित पवारांवर केला.
भाजपवर हल्लाबोल
प्रभू श्रीराम हे जनतेच्या मनात आहेत. प्रत्येकाच्या हृदयात आहेत. चार खांद्यावर जातानाही जय राम श्रीराम जय जय राम असे म्हटले जाते. दोन माणसे भेटतात तेव्हा राम राम म्हणतात. माणसे जोडणारा राम भारताच्या मनात आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने अधिकार सांगण्याचा प्रयत्न केला तर रामभक्त ते मान्य करणार नाहीत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या