अहिल्यानगर : अज्ञात व्यक्तीने शिंदेंचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या कानशिलात लगावल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हा पूर्वनियोजित कट असू शकतो, संगमनेरला अशांत करण्याचा प्रयत्न करण्याऱ्याचं हे कृत्य असू शकते असं आमदार अमोल खताळ म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून व्यथित झालेल्यांनी कुणालातरी पुढे करून हे कृत्य केल्याचा आरोपही अमोल खताळ यांनी केला.
संगमनेरमधील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाला. या घटनेनंतर हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनेनंतर तर खताळ समर्थक आक्रमक झाले असून शहरात सध्या तणावाचं वातावरण आहे.
विरोधकांचे कृत्य असू शकते
आमदार अमोल खताळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून संगमनेर अशांत करण्याचा काहीजणांकडून प्रयत्न सुरू आहे. चार दिवासांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संगमनेरमध्ये एक भव्य रॅली आणि सभा झाली होती. त्यामुळे काही व्यथित झालेल्या लोकांकडून कुणालातरी पुढे करून हा हल्ला केला गेला असेल. याबाबत पोलीस तपासातून सत्य समोर येईल.
नेमकं काय झालं?
संगमनेरमधील एका कार्यक्रमामध्ये आमदार अमोल खताळ हे बाहेर पडत असताना अनेक लोक त्यांना भेटत होते. त्यावेळी एक युवक आला आणि त्याने आमदार खताळांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं आमदार अमोल खताळ म्हणाले.
या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आपण या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो असं ते म्हणाले. विखे पाटील म्हणाले की, "अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून जर महायुतीच्या आमदारांचे खच्चीकरण होत असेल असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. तो गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही. या हल्ल्यामागे कोण आहे याचा शोध पोलीस घेतील."
बाळासाहेब थोरात- अमोल खताळ वादाने तणाव
गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यातील वादाने टोक गाठलं आहे.
ही बातमी वाचा: