अहमदनगर: शनिशिंगणापूर येथील शनि (Shani) मंदिरात जाणारा भुयारी मार्ग आजपासून भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. अडीचशे मीटरचा हा भुयारी मार्ग असून, या भुयारी मार्गामुळे मंदिर प्रवेशद्वारासमोरील वाहतुकीची गर्दी कमी होणार आहे. शनि मंदिर प्रवेशद्वाराकडे येणारा भुयारी मार्ग प्रवाशांसाठी खुला झाल्याने भाविकांना चांगली सुविधा प्राप्त झाली आहे.

Continues below advertisement

वाहनतळाहून थेट मंदिराकडे जाणार रस्ता

पानस नदी सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत शनि मंदिराच्या समोरील बाजूस 55 कोटीची विकास कामं सुरू आहेत, यातच हा भुयारी मार्ग असून या मार्गामुळे भाविकांना वाहनतळातून थेट मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत सरळ पोहोचता येणार आहे. मागील दहा वर्षांपासून ही विकास कामं सुरू असून आता ही कामं पूर्णत्वाकडे जात आहेत.

शनि मंदिराच्या दर्शन मार्गात बदल

भाविकांना सुलभतेने शनिदर्शन घेता यावं, यासाठी बुधवारपासून (22 नोव्हेंबर) दर्शन मार्गात बदल करण्यात आला आहे. मुख्य दर्शन मार्ग बंद करण्यात येत असून, आता नव्याने बांधलेल्या वाहनतळातून भुयारी मार्गाने भाविकांना शनिदर्शनासाठी जावं लागणार आहे. भाविकांनी या नव्या भुयारी मार्गाचा अवलंब करावा, असं आवाहन शनैश्चर देवस्थान प्रशासनाने केलं आहे. महाद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम भेटीचं शिल्प उभारण्याचं काम हाती घेतलं जाणार असल्याने महाद्वारासमोरील सध्या सुरू असलेला मुख्य मार्ग बंद करण्यात येत आहे.

Continues below advertisement

पानसतीर्थ प्रकल्पाचं शेवटचं काम हाती

शनी चौथऱ्यापर्यंत जाण्यासाठी वाहनतळावरील मुख्य गेट क्रमांक एक मधून भुयारी मार्गाने मंदिराकडे जाण्याचा मार्ग भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पानसतीर्थ प्रकल्पाचं शेवटचं काम हाती घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळील विविध कामं करण्यासाठी सध्या सुरू असलेला मार्ग बंद करण्यात येत आहे. भाविकांनी नव्याने उभारलेल्या दर्शन मार्गाचा अवलंब करावा, जेणेकरून भाविकांसाठी सोयीचं दर्शन घेईल, असं मंदिर प्रशासनाने म्हटलं आहे.

उद्घाटनाविनाच दर्शन मार्ग खुला

शनिशिंगणापूर येथे पानसतीर्थ प्रकल्पाची कामं अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या अंतर्गत तब्बल तेरा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भुयारी मार्ग भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. तत्पूर्वी मुख्य गेटवर वॉल कंपाऊंड तसेच महाद्वारसमोर पुतळा उभारण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात येत असल्याने नव्याने उभारलेल्या दर्शन मार्गाने भाविक शनि दर्शनासाठी लाभ घेत आहेत. भव्यदिव्य दर्शन मार्गाचा हा प्रकल्प सुरू होत असताना उद्घाटनाविनाच या रांगेतून भाविक भक्तांना दर्शनासाठी पाठवलं जात आहे. विविध कामं झाल्यानंतर लगेच येत्या काही दिवसांत दर्शनरांग पानसतीर्थ प्रकल्पाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली.

हेही वाचा:

Shani 2024: नववर्षात शनि आणि केतूची 'या' 5 राशींच्या लोकांवर असणार विशेष कृपा; धन-संपत्ती वाढणार, कलह मिटणार