Ahmednagar, Sanjay Bansode : मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची सुतोवाच राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केले असून ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते...  नगर शहराचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना लवकरच मंत्रीपदाची संधी भेटेल असं वक्तव्य ही त्यांनी यावेळी बोलताना केलं...अहमदनगर जिल्ह्याला क्रीडा विभागासाठी  अपेक्षित निधी देण्याचे कबूल करतांना त्यांनी संग्राम जगताप यांचा लवकर भविष्यातील 'नामदार' असा उल्लेख केला आहे.


मराठा आरक्षणावर काय म्हणाले ?


मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण पदयात्रा मुंबईकडे निघाली आहे, यावर बोलताना मंत्री बनसोडे म्हणाले की, आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देणार आहे आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. 


अहमदनगर जिल्ह्यासाठी क्रीडा विभागात कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिला आहे. अहमदनगर शहरातील भव्य अशा वाडिया पार्क मैदानाची त्यांनी पाहणी केली. या मैदानावर राज्य आणि देश पातळीवरील विविध सामने खेळवण्यासाठी जे बदल करणे गरजेचे आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे शब्द मंत्री संजय बनसोडे यांनी दिला. अहमदनगर शहरातून जास्तीत जास्त खेळाडू हे तयार व्हावेत यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून जे काही करता येईल, ते आम्ही करू असं बनसोडे म्हणाले. 


45 पेक्षा जास्त खासदारांचं लक्ष - 


राज्यामध्ये 45 प्लसचे आमचे टारगेट घेऊन आम्ही 2024 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना बसवण्यासाठी महायुतीचे काम करत आहोत असेही त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांनी पुन्हा एकत्र यावे असं आपल्याला वाटते का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आमचे केवळ मिशन 45 लक्ष्य असल्याचे म्हंटले आहे.


राज्यात ऑलम्पिक भवन बांधणार - 


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेनुसार राज्यात लवकर ऑलम्पिक भवन बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले... राज्यात ओलांपिक भवन नसल्याने खेळाडूंची अडचण होत होती मात्र लवकर आम्ही ओलांपिक भवनचे भूमिपूजन करू असं त्यांनी म्हटले आहे.


अहमदनगर शहरात लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे, त्यासाठी संबधित जागेवर असणारे अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केल्याबाबत त्यांनी आभार मानले. नगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केलंय.