अहमदनगर : भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी येऊ घातलेली लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. जर पक्षाने आदेश दिला तर मी नक्कीच लोकसभा निवडणुक लढवेन, 2014 सारखं मी नकार देणार नाही, मी लोकसभा निवडणूक लढविण्याची मानसिक तयारी केली आहे असं आमदार राम शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार राम शिंदे जरी लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार झाले असले तरील कोणत्या लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार हे स्पष्ट केलेलं नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विखे-पाटील कुटुंबीयांबाबत पक्ष श्रेष्टींकडे तक्रार त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्यात आणि खासदार सुजय विखे, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र या संदर्भामध्ये अजित पवार यांनी आज स्पष्टीकरण देत माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या या तथ्यहिन असल्याचं म्हटलं आहे. याबाबत बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, अजित पवार यांनी जरी स्पष्ट केलं असलं तरी हे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना एवढा उशीर का लागला? यामध्येच काहीतरी गडबड आहे.
सध्याचे सरकार हे लवकरच पडणार आहे असं विरोधकांकडून म्हटलं जातंय. याबाबत बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाला एकत्र ठेवणे हीच त्यांच्यासाठी कसरत बनलेली आहे. त्यामुळेच ते आमच्यावर अशा पद्धतीने टीका करतात.
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीसाठी आमदार राम शिंदे यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, याआधी देखील माझ्यावरती गोव्याची जबाबदारी दिलेली होती. तिथे भाजपचे सरकार आलं आणि आता कर्नाटकमध्ये देखील आमची जोरदार तयारी सुरू आहे.
अहमदनगरमध्ये छत्रपती शिवराय निमंत्रित कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या मैदानाचे राम शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. दरम्यान, या कुस्ती स्पर्धेमध्ये 1200 पेक्षा जास्त मल्ल येणार असून महाराष्ट्र केसरी तसेच देश पातळीवरील मोठे मल्ल सहभागी होणार असल्याचं आमदार राम शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या तोडीस तोड अशी हे शिवराय केशरी कुस्ती स्पर्धा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही बातमी वाचा: